इन्फोसिसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची कमान नारायणमूर्ती यांनी पुन्हा एकदा सांभाळल्यानंतर कंपनीच्या शेअर्सच्या भावात सहा टक्क्यांची वाढ झालीये. सोमवारी सकाळी मुंबई शेअर बाजार सुरू झाल्यानंतर इन्फोसिसचे शेअर खरेदी करण्याकडे गुंतवणूकदारांचा कल दिसल्याने शेअर्सच्या भावात ५.६५ टक्क्यांची वाढ झाली. 
इन्फोसिसची ढासळत असलेली पत सुधारण्यासाठी देशातील दुसऱया क्रमांकाच्या माहिती-तंत्रज्ञान कंपनीला शनिवारी मुख्य संस्थापक एन. आर. नारायणमूर्ती यांचा टेकू घ्यावा लागला होता. दोन वर्षांपूर्वी कंपनीच्या सक्रिय कारभारातून निवृत्त झालेल्या मूर्ती यांची अनपेक्षितपणे कंपनीच्या कार्यकारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्या पार्श्वभूमीवर शेअरच्या भावात वधारणा झाल्याने गुंतवणूकदारांनी मूर्ती यांच्या निवडीला पाठिंबा दिल्याचे दिसते आहे.