रतन टाटा आणि नारायण मूर्ती ही भारतीय उद्योग जगतातील दोन मोठी नावं आहेत. अनेक तरुण या दोन दिग्गजांना आपला आदर्श मानतात. आपल्या कामगिरीने त्यांनी अनेकांना प्रेरणा दिली आहे. इतकं यश मिळूनही आजही दोघे आपला साधा सरळ स्वभाव आणि साध्या राहणीसाठी ओळखले जातात. अनेकदा याची प्रतिचीही मिळत असते. नुकतंच एका कार्यक्रमात पुन्हा दोघांच्या मनाचा मोठेपण पहायला मिळाला. रतन टाटा यांना पुरस्कार दिल्यानंतर नारायण मूर्ती चक्क रतन टाटा यांच्या पाया पडले आणि आशीर्वाद घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टायकॉन पुरस्कार सोहळ्यात रतन टाटा यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. हा पुरस्कार इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या हस्ते रतन टाटा यांना देण्यात आला. यावेळी पुरस्कार दिल्यानंतर नारायण मूर्ती रतन टाटांच्या पाया पडले आणि आशीर्वाद घेतला. नारायण मूर्ती आणि रतन टाटा यांच्यात वयाचं जास्त अंतर नाही. दोघांमध्ये फक्त दहा वर्षाचं अंतर आहे.

यावेळी बोलताना रतन टाटा यांनी स्टार्टअपमध्ये गुंतवणुकदारांचे पैसे बुडवून पळून जाणाऱ्यांना दुसरी किंवा तिसरी संधी दिली जाणार नाही असं सांगितलं आहे. रतन टाटा स्वत: अनेक स्टार्टअप कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत असतात. रतन टाटा यांनी अशावेळी वक्तव्य केलं आहे जेव्हा स्टार्टअप कंपन्यांवर कॅश बर्नचा आरोप लागत आहे. स्टार्टअपमध्ये भविष्यात फायदा होण्याच्या अपेक्षेने सतत मोठं नुकसान सहन करणे याला कॅश बर्न म्हणतात. उदाहरण द्यायचं झाल्यास आपण फ्लिपकार्टकडे पाहू शकतो. फ्लिपकार्टने एकावेळी आपला व्यवसाय वाढवण्यासाठी एका महिन्यात जवळपास करोडो रुपये खर्च करत होती.

रतन टाटा यांनी उद्योगात नैतिकता जपली पाहिजे असं म्हटलं आहे. “आपल्याला असे स्टार्टअप मिळतील जे आपलं लक्ष आकर्षित करतील. नंतर ते पैसे जमा करतील आणि गायब होतील. अशा स्टार्टअपना दुसरी किंवा तिसरी संधी मिळणार नाही,” असा इशारा रतन टाटा यांनी यावेळी दिला.ई-कॉमर्स कंपनी स्नॅपडीलमध्ये गुंतवणूक करणाऱ्या रतन टाटा यांनी उद्योगात नैतिकता जपली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. एका रात्रीत प्रसिद्ध होण्याच्या पद्धतींपासून सावध राहिलं पाहिजे. स्टार्टअपला मार्गदर्शन, सल्ला, नेटवर्किंग आणि ओळखीची गरज असते असंही रतन टाटा यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व अर्थसत्ता बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Infosys narayan murthy ratan tata tiecon mumbai 2020 lifetime achievement award sgy
First published on: 29-01-2020 at 11:57 IST