फटाके भरलेलं अननस खायला दिल्यानंतर गर्भवती हत्तीणीचा मृत्यू झाल्याची केरळमधली घटना ताजी असतानाच आता केरळमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू झाला आहे. नीलांबूर जंगलात हा हत्ती मृतावस्थेत सापडला आहे. या हत्तीच्या अंगावर अनेक जखमा आढळल्या आहेत. हत्तीच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्याच्या मृत शरीरावर अंत्यसंस्कार करण्यात आले. हा हत्ती अत्यंत गंभीर जखमी होता. त्याच्यावर वन विभागाकडून उपचारही सुरु होते. गेल्या पाच दिवसांपासून त्याच्यावर उपचार सुरु होते. मात्र तो उपचारांना प्रतिसाद देत नव्हता. अखेर त्याचा मृत्यू झाला. एएनआयने या संदर्भातले वृत्त दिले आहे.

त्याच्या अंगावर अनेक जखमा होत्या. दुसऱ्या हत्तीसोबत त्याची लढाई झाली असावी त्यामुळे या जखमा त्याच्या अंगावर आल्या असाव्यात असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हा हत्ती तेथील ग्रामस्थांना जखमी अवस्थेत दिसल्यानंतर लगेचच वन विभागाला कळवण्यात आलं. वन विभागाने त्याच्यावर उपचार सुरु केले. वायनाड येथूनही एक पथक या हत्तीवर उपचार करण्यासाठी आलं होतं. मात्र या उपचारांना तो प्रतिसाद देत नव्हता.

२७ मे रोजी एका गर्भवती हत्तीणीला फटाके असलेलं अननस खायला दिल्याने तिचा अंत झाल्याची बातमी काही दिवसांपूर्वीच समोर आली होती. आता केरळमध्ये आणखी एका हत्तीचा मृत्यू झाला आहे. वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार केरळमध्ये या वर्षात ५० हत्तींचा मृत्यू झाला. ज्यापैकी ४७ मृत्यू हे नैसर्गिक कारणामुळे झाले. तर तीन मृत्यूंमागचे कारण नैसर्गिक नव्हते. मागील वर्षात १२० हत्तींचा मृत्यू केरळमध्ये झाला. त्यामध्ये १० हत्तींच्या मृत्यूंमागचे कारण नैसर्गिक नव्हते. तर ११० हत्तींचा मृत्यू नैसर्गिक कारणामुळे झाला. नैसर्गिक मृत्यू हे हत्तीला आलेलं म्हातारपण, गंभीर आजार यामुळे होतात. तर नैसर्गिक नसणारे मृत्यू हे स्फोटकं, शिकार, अपघात, इलेक्ट्रिक शॉक यामुळे होतात असंही वन विभागाने सांगितलं आहे.