प्रथम क्रमांक मिळवूनही फेलोशिप नाकारली

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (यूजीसी) भोंगळ कारभाराचा फटका डॉ. राधाकृष्णन पोस्ट डॉक फेलोशिपसाठी देशभरातून प्रथम क्रमांक मिळवलेल्या मराठी संशोधक विद्यार्थ्यांला बसला आहे. कोल्हापूरच्या डॉ. परशराम पाटील यांना यूजीसीच्या उच्चस्तरीय समितीने राधाकृष्णन फेलोशिपसाठी देशभरातून पहिला क्रमांक दिला. मात्र, पाटील यांनी निवडलेल्या बीट्स पिलानी गोवा कॅम्पसला मान्यता नसल्याचे कारण सांगून यूजीसीने त्यांना आता फेलोशिपच नाकारली आहे. प्रत्यक्षात गोवा कॅम्पसला मान्यता नसल्याची सूचना यूजीसीने लेखीस्वरूपात वा संकेतस्थळाद्वारे विद्यार्थ्यांना कळवली नाही. सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने यूजीसीने दिलेल्या पर्यायांमधूनच डॉ. पाटील यांनी संशोधनासाठी बीट्स पिलानी गोवा कॅम्पस निवडला होता.
जुलैमध्ये प्रस्ताव सादरीकरण व मुलाखतीत प्रथम क्रमांक मिळवूनदेखील यूजीसीकडून नोव्हेंबपर्यंत कोणताही पत्रव्यवहार न झाल्याने डॉ. पाटील यांनी ई-मेल द्वारे संबंधित विभागाशी संपर्क साधला. डझनभर मेल पाठविल्यानंतरही उत्तर देण्याचे सौजन्य यूजीसीने दाखविले नाही. शेवटी डॉ. पाटील थेट दिल्लीत यूजीसी कार्यालय गाठले. तेथे यूजीसीची चूक असल्याचे निदर्शनास आल्यानंतरही डॉ. पाटील यांनी देशभरात कोठेही संशोधनासाठी जाण्याची तयारी दर्शवली. तसे लेखी विनंतीपत्र यूजीसी अध्यक्ष डॉ. वेद प्रकाश यांना दिले, परंतु यूजीसीने चूक सुधारण्याऐवजी डॉ. पाटील यांना थेट फेलोशिपच नाकारली. अर्थात हेदेखील लेखी न कळवता डॉ. पाटील यांना तोंडी सांगण्यात आले. यूजीसीच्या कारभाराविरोधात दाद मागण्यासाठी डॉ. पाटील गेल्या १५ दिवसांपासून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या कार्यालयात फेऱ्या मारत आहेत. तेथे त्यांची कुणीही दखल घेतली नाही. आयोगाचे अध्यक्ष डॉ. वेद प्रकाश भेटायलादेखील तयार नाहीत. आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सरळ हात वर करून, चूक आमचीच असली तरी डॉ. वेद प्रकाश हेच यासंबंधी अंतिम निर्णय घेऊ शकतात, असे सांगून जबाबदारी झटकली. कुठेही दाद मिळत नसल्याने अक्षरश नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर दोन दिवस कसेबसे राहणाऱ्या डॉ. परशराम पाटील यांची डॉ. नरेंद्र जाधव यांनी निवासाची व्यवस्था केली. डॉ. पाटील यांच्यावर झालेल्या अन्यायाविरोधात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी थेट स्मृती इराणी व वेद प्रकाश यांना पत्र लिहिले, परंतु गडकरी यांच्या पत्रासदेखील इराणी व वेद प्रकाश यांनी महत्त्व दिले नाही.

काय आहे प्रकरण?

’डॉ. पाटील यांची राधाकृष्णन पोस्ट डॉक फेलोशिपसाठी देशभरातील ८५ हजार विद्यार्थ्यांमधून निवड
’केवळ दोनशे विद्यार्थ्यांनाच ही फेलोशिप मंजूर
’पाटील यांचा ‘फॉरेस्ट अकाऊंटिंग ऑफ कोल्हापूर डिस्ट्रिक्ट’ विषय पहिल्या क्रमांकाचा ठरला
’ऑक्टोबपर्यंत २ ते २०० क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष फेलोशिप देण्यात आली; मात्र, पाटील यांना फेलोशिप देण्यात आली नाही
’पाटील यांनी निवडलेल्या बीट्स पिलानी या गोव्याच्या केंद्राल मंजुरी नसल्याचे यूजीसी अधिकाऱ्यांचे म्हणणे

‘तुमच्यावर अन्याय झाला असला तरी, पुढच्या वर्षी काहीही झाले तरी तुम्हालाच संधी देऊ’, अशी राजकीय आश्वासने देत यूजीसीचे अधिकारी देत आहेत. हे अन्यायकारक आहे.
– डॉ. परशराम पाटील