जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूंशी (SARS-CoV-2 अर्थात Covid-19) लढण्यासाठी काही लोकांमध्ये आधीच रोगप्रतिकार शक्ती असू शकते, असं संशोधन ‘नेचर रिसर्च’ नावाच्या संशोधन पत्रिकेत प्रकाशित झालं आहे. ही रोगप्रतिकार शक्ती अशा लोकांमध्ये निर्माण होऊ शकते ज्यांना यापूर्वी इतर करोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाला होता, असंही या अभ्यासात म्हटलं आहे. सिंगापूरच्या ड्यूक-एनयूएस मेडिकल स्कूलमध्ये यासंदर्भात संशोधन झालं आहे.

हे संशोधन करताना वैज्ञानिकांच्या एका टीमने मागील रोगजनकांचा प्रभाव असलेल्या मेमरी टी सेल्सची (पेशी) चाचणी केली. या पेशी काही अंशी संक्रमणाची वैद्यकीय तीव्रता निश्तिच करु शकतात. कोविडच्या आजारातून नुकताच बरा झालेल्या रुग्णामधील रचनात्मक आणि बिगररचनात्मक भागांना या टी पेशींचा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. त्याचबरोबर संशोधकांना NP या विशिष्ट प्रथिनांमधील विविध भाग ओळखण्यासाठी सीडी 4 आणि सीडी 8 टी पेशींची उपस्थितीही दिसून आली आहे. इंडिया टुडेनं यासंदर्भात वृत्त दिले आहे.

संशोधकांनी म्हटलं की, २००३ मध्ये आलेल्या सार्स (SARS) या आजाराच्या प्रकोपानंतरही १७ वर्षांनंतर SARS-NP या आजारामधील प्रदीर्घ काळापासून टिकणारी मेमरी टी पेशी रोगप्रतिकार शक्ती निर्माण करीत आहे. या पेशींनी SARS-CoV-2 NP आजाराला प्रखर प्रतिकार करुन दाखवला आहे. यापुढे संशोधकांना असेही दिसून आले आहे की, SARS-CoV-2 अर्थात करोना विषाणूंच्या विशिष्ट टी पेशी सार्स, कोविड-१९ हा आजार झालेला नाही किंवा या विषाणूंच्या बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले नाहीत, अशांमध्येही आढळून आल्या आहेत. या अभ्यासात असेही म्हटले आहे की, बाधित नसलेल्या डोनर्समधील SARS-CoV-2 टी पेशींमध्ये या रोगप्रतिकारशक्तीचे विविध प्रकार दिसून आले. हे ORF-1 कोडेड प्रोटिन्स NSP7, 13 त्याचबरोबर NP प्रोटिनला नेहमी टार्गेट करीत असतात.

शेवटी या संशोधनाच्या निष्कर्षात म्हटले की, बिटा करोना विषाणूचा संसर्ग NP प्रथिनांमध्ये दीर्घकाळ टिकणाऱ्या टी पेशींची प्रतिकारशक्ती निर्माण करतो. या संशोधनाचे लेखक नीना ले बर्ट आणि एन्थोनी टी टॅन सांगतात की, “सर्वसामान्य लोकांमध्ये उपस्थित NP आणि ORF-1 ही प्रथिने विशिष्ट टी पेशींना ओळखतात त्यामुळेच ती कोविड-१९ आजाराला चांगला प्रतिकार करीत आहेत.”