‘पेगॅसस’ हेरगिरी तंत्रज्ञानाद्वारे काही महत्वाच्या व्यक्तींवर पाळत ठेवण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात आली असल्याने देशात सध्या राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. विरोधी नेत्यांनी केंद्रसरकारवर शंका व्यक्त केली आहे. दरम्यान, अधिवेशनाच्या निमित्ताने हा विषय चांगलाच तापला असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. यावेळी पेगॅसस प्रकरणी संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

शिवसेनेचे लाकसभेतले गटनेते विनायक राऊत यांनी पेगॅसस प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे. राऊत म्हणाले,  “पेगॅसस प्रकरणी संयुक्त संसदीय समिती स्थापन करुन चौकशी करण्यात यावी. फोन टॅप करणं हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे. तसेच काल गृहराज्यमंत्र्यांनी सभागृहात केलेलं विधान हे दिशाभूल करणारं आहे.”

तसेच पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमंती आणि महागाईवर आम्ही सरकारला प्रश्न करणार आहोत, असे विनायक राऊत म्हणाले. ते एबीपी माझा वृत्तवाहीणीशी बोलत होते.

हेही वाचा- Explained: एका मिस कॉलने मोबाइल हॅक करु शकणारं पेगॅसस म्हणजे नेमकं काय?

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी, माहिती व तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह अन्य एक मंत्री, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर, माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा आदींनाही ‘पेगॅसस’द्वारे लक्ष्य करण्यात आल्याची शक्यता माध्यमांनी वर्तवली आहे. अधिवेशनाच्या निमित्ताने हा विषय चांगलाच तापला असून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. आजही सभागृहात हा मुद्दा गाजणार असल्याचे संकेत विनायक राऊत यांनी दिले आहेत.

महाराष्ट्रातही पेगॅससचा वापर?; संजय राऊतांकडून गंभीर आरोप

इस्त्रायल हा भारताचा मित्र आहे आणि माजी पंतप्रधान नेत्यानाहू आणि पंतप्रधान मोदी यांचे मिठ्या मारतानाचे फोटो सगळ्यात जास्त प्रसिद्ध झाले आहेत. पेगॅससचा भारतीय लोकशाहीला धोका आहे आणि देशाची बदनामी आहे हे त्यांनी आम्हाला सांगू नये कारण नेत्यानाहूंच्या प्रचाराला मोदींचे पोस्टर लागले होते. या देशातल्या पत्रकारांह हजारो प्रमुख लोकांसह फोन रेकॉर्ड झाले आहेत. त्यामुळे या चोऱ्यामाऱ्या बंद करणं थांबवलं पाहिजे, असं संजय राऊत म्हणाले. हा जनतेशी विश्वास घात आहे. आज आमची नावं दिसत नसली तरी ती त्यात असणार आहेत याची आम्हाल खात्री आहे. महाराष्ट्रातील अनेक नावे त्यात असण्याची शक्यता आहे असे राऊत म्हणाले.

महाराष्ट्रात पेगॅससचा वापर झालेला असू शकतो असे पत्रकारांनी विचारले असता राऊत यांनी १०० टक्के याचा वापर झालेला आहे असे म्हटले. “महाराष्ट्रात अशी तंत्रज्ञान आणि यंत्रणा आम्हाला रोखण्यासाठी वापरली गेली आणि आजही वापरली जात असावी. हे फार मोठं षडयंत्र आहे आणि सरकारी मदतीशिवाय अशा प्रकारचं धाडस आणि हिम्मत कोणी करु शकत नाही,” असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

‘पेगॅसस’ काय आहे?

जगभरातील महत्त्वाचे सुमारे १,४०० मोबाईल क्रमांक हॅक करण्यासाठी गुप्तहेरांनी ‘पेगॅसस’ या तंत्रज्ञानाचा वापर केला होता. ‘पेगॅसस’ हे हेरगिरी तंत्रज्ञान इस्रायलच्या एनएसओ या कंपनीने विकसित केले आहे, अशा बातम्या २०१९मध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. व्हॉटसअ‍ॅप या समाजमाध्यम कंपनीने इस्रायली गुप्तहेर संस्था- ‘एनएसओ’ला न्यायालयात खेचण्याचा इशारा २०१९च्या ऑक्टोबरमध्ये दिला होता.