रिपब्लिक टिव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे माजी अध्यक्ष पार्थ दासगुप्ता यांच्यात झालेल्या व्हॉट्सअॅप चॅटची संयुक्त संसदीय समितीकडून (जेपीसी) चौकशी करा, अशी मागणी काँग्रेसने केंद्र सरकारकडे केली आहे.

काँग्रेसने म्हटलं की, “गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील चॅटिंग याचा पुरावा आहे की, भाजपाच्या कार्यकाळात झालेला बालाकोट एअर स्ट्राइक लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करण्यात आला होता. हा ड्रामा उघड करण्यासाठी काँग्रेस लवकरच मोठी पत्रकार परिषद घेणार असून याप्रकरणी गंभीरपणे चौकशीची मागणी करणार आहे.”

Video : अर्णब व्हॉट्सअ‍ॅप चॅट प्रकरण… राज ठाकरेंचा ‘तो’ व्हिडीओ पुन्हा व्हायरल

दरम्यान काँग्रेस खासदार मनिष तिवारी यांनी लीक झालेले व्हॉट्सअॅप चॅट ट्विट केले आणि म्हणाले, “राष्ट्रीय सुरक्षेचा वापर हा निवडणुकांसाठी करण्यात आला होता का? माध्यमांमधील एक गट ज्या पद्धतीने रिपोर्टिंग करत आहे ते जर खरं असेल तर बालाकोट एअर स्ट्राईक आणि २०१९ लोकसभा निवडणुकांच्या थेट संबंधांकडे इशारा करतात. त्यामुळे याची जेपीसीद्वारे चौकशी गरजेची आहे.”

आणखी वाचा- अर्णब गोस्वामींचं कोर्ट मार्शल करणार का? संजय राऊत यांचा सवाल

माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना ट्विटर टॅग करताना काही सवाल केले आहेत. त्यांनी म्हटलं, “एक पत्रकार आणि त्याचे मित्र बालाकोटमधील दहशतवादी कँप उध्वस्त करणाऱ्या स्ट्राईकबाबत प्रत्यक्ष हल्ल्यापूर्वी तीन दिवस आधीच कल्पना होती? जर कल्पना होती तर याची काय गॅरंटी आहे की, त्यांच्या सुत्रांनी पाकिस्तानसाठी काम करणाऱ्या खबऱ्यांकडून दुसऱ्या लोकांसोबत ही माहिती शेअर केली नसेल. सरकारचा एक गोपनीय निर्णय एका पत्रकारापर्यंत कसा काय पोहोचला?”

आणखी वाचा- मी तेव्हाच बोललो होतो, मोदी सरकारनं निवडणुकीसाठी बालाकोटचा वापर केला -पाक पंतप्रधान

तर दुसरीकडे राज्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील या चॅट प्रकरणाची जेपीसीद्वारे चौकशीची मागणी केली आहे. तसेच हे व्हॉट्सअॅप चॅट गंभीर असल्याचं त्यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे.