संपूर्ण देशी बनावटीच्या आयएनएस-अरिहंत या आण्विक पाणबुडीची येत्या काही आठवडय़ांतच सागरी चाचणी घेण्यात येणार आहे. त्यामुळे सागरी मार्गाबरोबरच जमिनीवरून आणि हवाई मार्गाने होणाऱ्या हल्ल्यांना भारत पूर्ण क्षमतेने तोंड देण्यास सुसज्ज होणार आहे. सदर पाणबुडीची सध्या बंदरात चाचणी घेण्यात येत असून त्यामध्ये कोणत्याही समस्या उद्भवलेल्या नाहीत. त्यामुळे लवकरच तिची सागरी चाचणी घेण्यात येणार आहे. सदर पाणबुडीमुळे भारताच्या सागरी सामर्थ्यांत आणखी वाढ होणार असल्याचे रिअर अ‍ॅडमिरल एल. सरत बाबू यांनी सांगितले. पाणबुडीतील आण्विक भट्टी गेल्या १० ऑगस्ट रोजी कार्यान्वित झाली असून अरिहंत सागरी चाचणीसाठी समुद्रात गेल्यानंतर आणखी एक मैलाचा दगड गाठला जाणार आहे. या चाचणीसाठी नौदलाकडून शक्य ते सर्व सहकार्य देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे अ‍ॅडमिरल बाबू यांनी सांगितले.