स्वदेशी बनावटीच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेच्या चाचण्या यशस्वी

गेल्या काही वर्षांत संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेमध्ये (डीआरडीओ)भारतीय नौदलाच्या युद्धनौकांना शत्रूपासून रोखणारे ‘कवच’ प्राप्त करून देणारे संशोधन सुरू होते. या ‘कवचा’चे सर्व पहिले प्रयोग ‘आयएनएस चेन्नई’ या, सोमवारी भारतीय नौदलात समारंभपूर्वक दाखल होणाऱ्या विनाशिकेवर करण्यात आले. त्याच्या सर्व चाचण्या यशस्वी झाल्यानंतर सर्वात पहिले ‘कवच’ही आता याच युद्धनौकेवर चढविण्यात आले आहे. आता यापुढे नौदलात दाखल होणाऱ्या सर्व युद्धनौकांनाही ‘कवच’प्राप्ती होईल!

India Ballistic Missile Defence
विश्लेषण :‘आयर्न डोम’ मुळे इस्रायलचा बचाव… भारताकडे कोणती हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणाली?
IRGC behind Israel attack
इस्रायलच्या हल्ल्यामागे कुणाचा हात? ज्यू राष्ट्रावर हल्ला करणारी इस्लामिक संघटना कोणती?
indian air force
युद्ध, मदत व बचावकार्य या आघाड्यांवर भारतीय हवाई दल किती कार्यक्षम? ’गगन शक्ती २०२४‘ कवायतीने दिले उत्तर!
successfully test fired advanced missile Agni Prime from APJ Abdul Kalam Island
‘अग्नी-प्राइम’ क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

शत्रूच्या युद्धनौका अथवा हवाई टेहळणीदरम्यान भारतीय युद्धनौका आढळल्यानंतर त्यांनी क्षेपणास्त्र डागल्यास युद्धनौकेचा हमखास बचाव करणारे क्षेपणास्त्रविरोधी क्षेपणास्त्र वापरण्याखेरीज दुसरा पर्याय आजवर नौदलाकडे उपलब्ध नव्हता. म्हणूनच गेली काही वर्षे ‘डीआरडीओ’तर्फे शत्रूच्या क्षेपणास्त्राला चकवा देणाऱ्या ‘कवच’ या नव्या चकवायंत्रणेची निर्मिती सुरू होती. शत्रूचे क्षेपणास्त्र येते आहे, हे लक्षात येताच ‘कवचा’मधून एक विशिष्ट आभासी असे काही डागले जाते की, त्यामुळे युद्धनौकेपासून दूर अंतरावर एक मोठी युद्धनौकाच असल्याचा आभासी ढग निर्माण होतो. क्षेपणास्त्राला अधिक मोठी युद्धनौकाच असल्याचा आभास आहे, हे लक्षात येत नाही आणि युद्धनौकेऐवजी त्या आभासी ठिकाणी जाऊन ते फुटते. परिणामी युद्धनौकेचा यशस्वी बचाव होतो, असे हे तंत्र आहे. भारतीय नौदल आणि डीआरडीओने या संदर्भातील सर्व चाचण्या ‘आयएनएस चेन्नई’च्या सागरी व शस्त्रास्त्र चाचण्यांदरम्यानच घेतल्या. या सर्व चाचण्यांच्या यशस्वीतेनंतर हे ‘कवच’ सर्वप्रथम याच विनाशिकेवर चढविण्याचा निर्णय झाला, अशी माहिती पश्चिमी नौदल मुख्यालयाचे प्रमुख व्हाइस अ‍ॅडमिरल गिरीश लुथ्रा यांनी दिली.

भारतीय नौदलाच्या ‘प्रकल्प१५अल्फा’ मध्ये कोलकाता वर्गातील गायडेड मिसाईल विनाशिकांची निर्मिती करण्यात आली. त्यातील ही तिसरी आणि अखेरची विनाशिका आहे, असे सांगून लुथ्रा म्हणाले की, या तीन विनाशिकांच्या प्रकल्पावर नौदलाने सुमारे साडेअकरा हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. १६४ मीटर्स लांबीच्या या विनाशिकेचे वजन तब्बल साडेसात हजार टनांचे असून त्यावर स्वनातीत वेगात भूपृष्ठावरून भूपृष्ठावर मारा करणारी ब्राह्मोस, त्याचप्रमाणे लांब पल्ल्याची भूपृष्ठावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे बसविण्यात आली आहेत. याशिवाय पाणतीरांचा मारा झाल्यास त्यालाही चकवा देणारी ‘मारीच’ नावाची यंत्रणा प्रथमच बसविण्यात आली आहे. शत्रूचा संहार करणारी या अर्थाने संस्कृतमधील ‘शत्रो संहारक:’ हे या विनाशिकेचे घोषवाक्य आहे. सोमवारी, संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या हस्ते ही विनाशिका समारंभपूर्वक नौदलात दाखल होईल आणि ती नौदलाच्या पश्चिमी ताफ्यामध्ये कार्यरत असेल.

 

पाकिस्तानने पाणबुडी रोखल्याच्या वृत्ताचा भारताकडून इन्कार

पीटीआय : पाकिस्तानच्या सागरी हद्दीत शिरलेल्या भारतीय पाणबुडीचा माग लावून तिला पिटाळून लावल्याच्या वृत्ताचा भारताने नकार केला आहे.

पाकिस्तानच्या किनाऱ्यापासून दक्षिणेकडे १४ नोव्हेंबरला एका भारतीय पाणबुडीचा पाकिस्तानने माग लावला. पाकिस्तानी नौदलाच्या जहाजांनी त्यांच्या हद्दीत घुसलेल्या भारतीय पाणबुडीचा बराच वेळ पाठलाग केला आणि तिला आपल्या हद्दीबाहेर पिटाळून लावले. भारतीय पाणबुडीने चकवण्यासाठी केलेले प्रयत्न फसले आणि त्यातून पाकिस्तानी नौदलाने आपली क्षमता सिद्ध केली आहे, असे पत्रक पाकिस्तानी नौदलाने मंगळवारी प्रसिद्धीस दिले आहे.

त्याचा भारतीय नौदलाकडून इन्कार करण्यात आला. पाकिस्तानचा दावा निखालस खोटा आहे. असे काहीही घडलेले नाही. पाकिस्तान म्हणत आहे त्या विभागात भारतीय पाणबुडय़ांची कोणतीही हालचाल नाही, असे नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा यांनी सांगितले.

चीन- पाकिस्तान आर्थिक मार्गावरून आलेले पहिले कंटेनर नौदलाच्या संरक्षणात अरबी समुद्रातून मध्यपूर्व आणि आफ्रिकेकडे सुखरूप रवाना करण्यात आले, असेही पाकिस्तानने म्हटले. दरम्यान, भारताने नियंत्रण रेषेनजीक हल्ला करून सात पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याबद्दल भारताचा निषेध करणारा ठराव पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीने मंजूर  केला. पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी भारताच्या ११ जवानांना मारल्याचा दावा बुधवारी केला. तो भारतीय लष्कराने फेटाळला.