सामरिकदृष्टय़ा महत्त्वाचे असलेल्या आयएनएस सरदार पटेल या नव्या नौदल तळाचे शनिवारी कार्यान्वयन करण्यात आले. गुजरातच्या १६०० किलोमीटर लांब सागरी किनाऱ्याची सुरक्षा बळकट करण्यासाठी याची मदत होईल, असे नौदलप्रमुख आर. के. धोवन यांनी सांगितले.
गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल यांनी नामफलकाचे अनावरण करून आणि ‘कमिशनिंग वॉरंट’ वाचून दाखवून हा नौदल तळ कार्यान्वित केला. राज्याच्या सागरी किनाऱ्याच्या सुरक्षाविषयक बाबींकडे दुर्लक्ष केल्याबद्दल त्यांनी पूर्वीच्या संपुआ सरकारवर टीका केली.
याप्रसंगी बोलताना नौदलप्रमुख आर. के. धोवन यांनी या तळामुळे गुजरातची सागरी सुरक्षा बळकट होण्यास मदत होईल, असे सांगितले. १६०० किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेले गुजरात हे भरभराटीला येणारे सागरी राज्य आहे. राज्यातील ४३ खासगी व सार्वजनिक बंदरांचा देशाच्या सागरी उद्योगात ५० टक्के सहभाग आहे. कच्छच्या आखातातून सुमारे १२० दशलक्ष कच्चे तेल गुजरातच्या तेलशुद्धीकरण कारखान्यांमध्ये पोहोचते, असे त्यांनी पत्रकारांना सांगितले.
सागरी किनाऱ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी नौदलावर आहे. आज कार्यान्वित करण्यात आलेल्या आयएनएस सरदार पटेल या नौदल तळामुळे गुजरातच्या किनारी भागात तैनात केली जाणारी आमची जहाजे, पाणबुडय़ा व विमाने यांच्यात समन्वय साधला जाईल. या सर्वाना प्रक्रियात्मक व प्रशासकीय मदत तसेच रसद या नव्या तळाकडून पुरवली जाईल, असे धोवन म्हणाले.