‘आयएनएस सिंधुरत्न’ या पाणबुडीत घडलेली दुर्घटना ही वायरींना लागलेल्या आगीमुळे घडली असे आज सांगण्यात आले. या दुर्घटनेत नौदलाचे दोन अधिकारी मृत्युमुखी पडले होते तर इतर सात खलाशी जखमी झाले होते. गेल्या आठवडय़ात ही दुर्घटना घडली होती. २६ फेब्रुवारीला घडलेल्या या घटनेच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीला असे आढळून आले की, आयएनएस सिंधुरत्न या पाणबुडीत वायरींना आग लागल्यामुळे दुर्घटना झाली. आधी वाटत होते त्याप्रमाणे बॅटरी विभागात हे घडले नाही, असे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. अजूनही चौकशी सुरू असून नौदलाच्या किलो क्लास गटातील दोन पाणबुडय़ांमध्ये गेल्या सात महिन्यात अशा दुर्घटना घडल्या आहेत. बॅटरीची जागा पूर्णपणे सुरक्षित होती, त्यावरील विभागात प्रथम आग लागली असे सांगण्यात आले. नौदल प्रमुख डी.के.जोशी यांनी या दुर्घटनेनंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला होता. सिंधुरत्न ही किलो क्लास गटातील पाणबुडी असून आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुटीत १४ ऑगस्ट २०१३ रोजी स्फोट होऊन १८ जण मृत्युमुखी पडले होते. आताच्या घटनेत सिंधुरत्न पाणबुडीचे आगीमुळे थोडे नुकसान झाले आहे.