भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) जीएसएलव्ही एफ-०५ प्रक्षेपकाच्या साह्याने इन्सॅट-३डीआर या उपग्रहाचे अवकाशात यशस्वी प्रक्षेपण केले. हवामानाची अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी या उपग्रहाचा उपयोग होणार आहे. या उपग्रहाचे पूर्वनियोजित प्रक्षेपण गुरुवारी दुपारी चार वाजून १० मिनिटांनी होणार होते. पण ते चार वाजून ५० मिनिटांपर्यंत पुढे ढकलण्यात आले होते.
इन्सॅट-३डीआर या उपग्रहाचे वजन २२११ किलोग्रॅम इतके आहे. जीएसएलव्ही प्रक्षेपकाच्या साह्याने ते निर्धारित कक्षेपर्यंत पाठविण्यात आले. या उपग्रहाचे आयुष्य आठ वर्षे इतके असून, हवामानाचा अभ्यास करण्यासाठी त्यामध्ये सर्व अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. संशोधन मोहिमा आणि भूस्तरिय संशोधनासाठी या उपग्रहाची मदत होणार आहे.