ज्यांना आपल्या नात्यांमध्ये असुरक्षित वाटत असते, असे लोक स्वत:कडे लक्ष वेधण्याच्या आशेने सतत ‘वॉल’वर पोस्ट करणे, कॉमेंट्स टाकणे, आपले ‘स्टॅटस अपडेट’ करणे किंवा एखादी गोष्ट ‘लाइक’ करणे अशा प्रकारांनी फेसबुकवर जास्त सक्रिय असतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
अमेरिकेतील युनियन कॉलेजमधील संशोधकांनी १८ ते ८३ वर्षे वयोगटातील सुमारे ६०० लोकांचे वेगवेगळे सर्वेक्षण केले. यात सहभागी झालेल्यांना त्यांची घनिष्ठ नात्याबाबतची वृत्ती आणि त्यांच्या फेसबुकवरील सवयी याबद्दल माहिती विचारण्यात आली.
फेसबुकवर सक्रिय असणाऱ्या लोकांचे किमान दोन प्रकार आहेत:  एक- जे ओढीबाबत अस्वस्थ असतात (अटॅचमेंट अँग्झायटी) आणि दुसरे- जे लोक बहिर्मुखतेबाबत वरच्या स्तरावर असतात.
पहिल्या प्रकारातील लोकांना असे वाटते की, इतर लोकांनी आपल्यावर जेवढे प्रेम करायला हवे तेवढे ते करत नाहीत. त्यांना इतरांकडून नाकारले किंवा त्यागले जाण्याची चिंता वाटत असते. असे लोक फेसबुकवर ‘फीडबॅक’ मिळण्याच्या अपेक्षेत असतात. आपल्यावर कुणी तरी प्रेम करते आहे याची त्यांना भरपूर हमी हवी असल्यामुळे आणि इतर लोकांच्या आपल्याबद्दलच्या मतांबाबत संवेदनशील असल्यामुळे ते फेसबुककडे वळतात, असे संशोधनपत्रिकेत प्रकाशित झालेल्या अहवालात म्हटले आहे.
अधिक सुरक्षित असणाऱ्या लोकांच्या तुलनेत ‘अटॅचमेंट अँग्झायटी’ जास्त असलेले लोक ‘फीडबॅक सेन्सिटिव्ह’ असतात, असे मानसशास्त्राचे सहयोगी प्राध्यापक आणि या अहवालाचे प्रमुख लेखक जोशुआ हार्ट यांनी म्हटले आहे.
या प्रकारच्या लोकांना भरपूर कॉमेंट्स, लाइक्स व इतर प्रकारचा फीडबॅक मिळतो, तेव्हा त्यांना स्वत:बद्दल खूप चांगले वाटते. याउलट, त्यांच्या फेसबुकवरील ‘अॅक्टिव्हिटी’कडे कुणी लक्ष देत नाही, तेव्हा त्यांना स्वत:बद्दल जास्त वाईट वाटते, असे हार्ट म्हणाले. बहिर्मुख लोक असुरक्षिततेची भरपाई करण्याच्या दृष्टीने लक्ष वेधण्याकरिता ‘पोस्टिंग’चा वापर करतात, मात्र त्यांच्या फेसबुकच्या सक्रिय वापराची कारणे ठरवण्यासाठी आणखी संशोधन आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.