काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी सोमवारी राहुल गांधी यांची भेट घेतली आणि मागच्या महिन्याभरापासून राजस्थानात सुरु असलेल्या सत्ता संघर्षावर अखेर पडदा पडला. सचिन पायलट यांनी बंडाचे निशाण फडकवल्यापासून त्यांची समजूत घालण्यासाठी काँग्रेसमध्ये वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरु होते. मागचा महिनाभर आपल्या मुद्यांवर ठाम असलेले सचिन पायलट अचानक समेटासाठी कसे तयार झाले? पुन्हा काँग्रेससोबत त्यांनी कसे जुळवून घेतले ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. नेमके पडद्यामागे काय घडले? ते आपण सजमून घेऊया.

सचिन पायलट यांनी रविवारी काँग्रेस सरचिटणीस के.सी.वेणूगोपाळ यांची भेट घेतली. या बैठकीमुळे पायलट कॅम्पमध्ये अस्वस्थतता निर्माण झाली. काही बंडखोर आमदारांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता सतावू लागली. आमदार आपली साथ सोडू शकतात ही गोष्ट लक्षात आल्यानंतर सचिन पायलट काँग्रेस नेतृत्वाबरोबर चर्चेसाठी तयार झाले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे. महिन्याभरापासून भाजपाशासित हरयाणातील रिसॉर्टमध्ये थांबलेल्या काँग्रेस आमदारांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यात काँग्रेस नेत्यांना यश आले. सचिन पायलट यांच्यासोबत १९ आमदार आहेत. कर्नाटक, मध्य प्रदेशची पुनरावृत्ती टाळण्साठी काँग्रेस नेत्यांनी सर्व कौशल्य पणाला लावून नाराज असलेल्या सचिन पायलट यांना पुन्हा आपल्या गोटात आणले.

आणखी वाचा- “देशसेवा करण्यासाठी सहिष्णू व्हा,” पायलट पक्षात परतल्यानंतर अशोक गेहलोत यांची प्रतिक्रिया

सचिन पायलट, प्रियंका गांधी, के.सी.वेणूगोपाल आणि अहमद पटेल यांच्यामध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या. पण राजस्थानातील सत्ताकोंडी फुटली नव्हती. अखेर खरा टर्निंग पाँईट शनिवारी आला. माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्या विश्वासातील सहा भाजपा आमदार गुजरात सोमनाथला गेल्याचे सचिन पायलट यांना समजले. १४ ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या विधानसभा सत्राआधी भाजपा खबरदारी म्हणून आपल्या सर्व आमदारांना एकत्र ठेवत आहे अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली. त्यानंतर सचिन पायलट काँग्रेस नेतृत्वाबरोबर चर्चा करायला तयार झाले.

आणखी वाचा- हे माझं काँग्रेस पक्षात कमबॅक नाही, तर… – सचिन पायलट

दुसऱ्यादिवशी रविवारी सचिन पायलट यांनी वेणूगोपाल यांची भेट घेतली. या भेटीचा पायलट कॅम्पमध्ये उलटा परिणाम झाला. पायलट कॅम्पच्या आमदारांमध्ये मतभेदांची सुरुवात झाली. काही आमदार काँग्रेस हायकमांडच्या संपर्कात होते. वरिष्ठ आमदार भंवर लाल शर्मा केसी वेणूगोपाल यांना भेटले. अन्य दोन आमदार वेणूगोपाल यांच्यासोबत फोनवरुन बोलले. सचिन पायलट आपल्याला अंधारात घेऊन वरिष्ठ नेत्यांबरोबर वाटाघाटी करत आहेत असा या आमदारांच्या मनात संशय निर्माण झाला. त्यांना त्यांच्या राजकीय भवितव्याची चिंता सतावू लागली. रविवारी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी बंडखोर आमदारांना माघारी फिरण्याचे भावनिक आवाहन केले. “भंवर लाल शर्मा आणि अन्य आमदारांनी गेहलोत यांना पाठिंबा दर्शवल्यामुळे सचिन पायलट यांच्याकडे पर्याय राहिला नाही” असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने इंडिया टुडेला सांगितले. आणखी आमदार याच वाटेने जाऊ नयेत, यामुळे सचिन पायलट यांना अखेर पुन्हा काँग्रेससोबत जुळवून घ्यावे लागले.