गोहत्येवरून सगळीकडेच वादंग सुरू असताना आता हरयाणाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित केले आहे. नेपाळने अलिकडेच गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित केले आहे. वीज यांनी वार्ताहरांना सांगितले, की आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्याबाबत विनंती करणार आहोत. अंबाला कॅन्टोन्मेंटचे पाच वेळा आमदार राहिलेले वीज यांनी सांगितले, की रॉयल बेंगाल टायगर म्हणजे वाघाऐवजी गायीला राष्ट्रीय प्राणी घोषित करावे. गाय हा भारतीय संस्कृतीतील सर्वात पवित्र प्राणी आहे व गायीला देवता मानले जाते. दादरी खेडय़ातील बिशदा येथे पन्नास वर्षे वयाच्या एका मुस्लीम व्यक्तीला घरात गोमांस ठेवल्याच्या संशयावरून दगडाने ठेचून ठार मारण्यात आले होते. त्यानंतर मंत्र्यांनी केलेल्या या विधानाला महत्त्व आहे. हरयाणा विधानसभेत या वर्षी मार्चमध्ये एक विधेयक मंजूर केले असून त्यात गायींना संरक्षण देण्याचे आश्वासन दिले आहे, गोहत्येवर बंदी घालण्यात आली आहे.