पश्चिम बंगाल : राज्यपाल-सरकार संघर्ष तीव्र

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सरकार आणि राज्यपाल जगदीप धनखार यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस विकोपाला जात असल्याचे संकेत मिळत आहेत. ममता बॅनर्जी यांनी आपल्याला विधानसभेत जाण्यापासून रोखल्याचा आरोप गुरुवारी राज्यपालांनी केला. विधानसभेत जाण्यासाठी राज्यपालांसाठी राखीव असलेल्या प्रवेशद्वाराला टाळे लावण्यात आले असल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यामुळे राज्यपालपदाचा अपमान करण्यात आला असून देशाच्या लोकशाही इतिहासाला काळिमा फासला गेला आहे, असे धनखार यांनी म्हटले आहे.

या प्रकारानंतर धनखार यांनी माध्यमांचे प्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यासाठी राखीव असलेल्या प्रवेशद्वार क्रमांक चारमधून विधानसभा संकुलात प्रवेश केला. आपण पूर्वसूचना दिलेली असतानाही प्रवेशद्वार क्रमांक तीन का बंद ठेवण्यात आले, विधानसभा संस्थगित होणे म्हणजे ती बंद झाली असा त्याचा अर्थ नाही, असे राज्यपालांनी म्हटले आहे. विधानसभेच्या निकषांनुसार प्रवेशद्वार क्रमांक तीन हे राज्यपालांना येण्याजाण्यासाठी राखीव आहे.

आपल्याला ग्रंथालयात यावयाचे आहे आणि सुविधांची पाहणी करावयाची आहे, असे राज्यपालांनी विधानसभेचे अध्यक्ष बिमन बॅनर्जी यांना बुधवारी कळविले होते. त्यानंतर राज भवनाच्या विशेष सचिवांनी, अध्यक्षांनी आपल्याला सपत्नीक भोजनाचे निमंत्रण दिल्याचे कळविले आणि आपण ते स्वीकारले. मात्र अवघ्या दीड तासातच आपल्या विशेष सचिवांना एक संदेश पाठविण्यात आला आणि निमंत्रण रद्द करण्यात आल्याचे त्याद्वारे कळविण्यात आले, असे राज्यपाल म्हणाले.

केवळ दीड तासाच्या कालावधीत काय घडले या बाबत राज्यपालांनी आश्चर्य व्यक्त केले, जो प्रकार घडला त्याने आपल्या स्थानाचे महत्त्व कमी झाले आहे, असे आपण अध्यक्षांना कळविणार असल्याचे धनखार म्हणाले.