शिखांच्या पवित्र धर्मग्रंथाची पाने रस्त्यावर टाकण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ शीख कार्यकर्त्यांनी दगडफेक केली त्या वेळी त्यांची पोलिसांशी चकमक झाली. पोलिसांना अश्रुधूर व पाण्याच्या फवाऱ्यांचा वापर करून निदर्शकांना पांगवावे लागले. नंतर सौम्य लाठीमारही करण्यात आला. या चकमकीत १५ जण जखमी झाले असून त्यात आठ पोलिसांचा समावेश आहे. फरिदकोट जिल्ह्य़ात त्यामुळे तणाव असून शांतता राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

किमान सहा हजार शीख लोकांनी शिखांच्या पवित्र धर्मग्रंथाचा अवमान करण्यास जबाबदार असणाऱ्यांना शिक्षा करावी, अशी मागणी करण्यासाठी निषेध मोर्चा काढला होता. त्या वेळी काहींनी दगडफेक केली, असे पोलिसांनी सांगितले.

फिरोझपूर परिक्षेत्राचे पोलिस महानिरीक्षक अमरसिंग चहल यांनी सांगितले, की संवादाचे सर्व मार्ग संपल्यानंतर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. शीख संघटनांशी पोलिसांनी संवाद साधण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पाचशे निदर्शकांना ताब्यात घेतले आहे. आता परिस्थिती नियंत्रणात असून सुरक्षा कुमक वाढवली आहे असे चहल यांनी सांगितले.

चोरलेल्या धर्मग्रंथाची पाने फेकली

फरिदकोट व मोगा जिल्ह्य़ातील अनेक खेडय़ांत समाजकंटकांविरोधात पोलिसांची गस्त सुरू आहे. शिखांचा पवित्र ग्रंथ भटिंडा-कोटकपुरा रस्त्यावर असलेल्या एका धार्मिक स्थळाच्या ठिकाणाहून चोरला होता व नंतर त्याची पाने रस्त्यावर टाकली होती.

मुख्यमंत्र्यांकडून निषेध

मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांनी या घटनेचा निषेध केला आहे. कुणीही शांतताभंग करू नये असे आवाहन त्यांनी केले. समाजकंटकांनी दुही पसरवू नये, ईश्वरनिंदेची कुठलीही कृती ही क्षम्य नसते, आता या घटनेशी संबंधित कुणाचीही गय केली जाणार नाही व कठोर कारवाई केली जाईल, असे त्यांनी सांगितले.