भारताला हवा असलेला मोस्ट वाँटेड दहशतवादी मौलाना मसूद अझहर सापडत नसल्याचे पाकिस्तानकडून सांगण्यात येत आहे. पण भारतीय गुप्तचर यंत्रणांनी मसूद अझहरचा पत्ता शोधून काढला आहे. बहावलपूरमध्ये रेल्वे लिंक रोडवरील मारकाझ-इ-उस्मान-ओ-अली येथे जैश-ए-मोहम्मदचे मुख्यालय आहे. याच मुख्यालयाच्या मागच्याबाजूला सर्वोच्च सुरक्षा व्यवस्थेमध्ये एका बॉम्बप्रूफ घरामध्ये मसूद अझहरला ठेवण्यात आले आहे.

मसूदला इतकी सुरक्षा का?
पठाणकोट एअर बेस, पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा मुख्य सूत्रधार असलेला जैश-ए-मोहम्मदचा हा म्होरक्या भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. भारताकडून मिसाइल हल्ला किंवा अन्य मार्गाने मसूदला लक्ष्य केले जाण्याची भिती असल्यामुळे पाकिस्तानने एका बॉम्बप्रूफ घरामध्ये त्याला लपवून ठेवले आहे. ‘ब्राह्मोस’ हे भारताचे सर्वात घातक क्षेपणास्त्र असून, ते लक्ष्यावर अत्यंत अचूकतेने प्रहार करण्यासाठी ओळखले जाते.

मागच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला दस्तावेज सोपवले. त्यामध्ये २०१६ सालच्या पठाणकोट एअरबेसवरील हल्ल्याच्या तपासात सापडलेला एक मोबाइल नंबर थेट बहालवपूरशी संबंधित होता.

इंटेलिजन्सने समोर आणलेली माहिती महत्वपूर्ण ?
एफएटीएफची रविवारपासून पॅरिसमध्ये बैठक सुरु होत आहे. त्यामध्ये पाकिस्तान मसूद बेपत्ता असल्याचे सांगू शकतो. त्या पार्श्वभूमीवर भारतीय तपास यंत्रणांनी समोर आणलेली माहिती अत्यंत महत्वपूर्ण आहे. FATF च्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी सध्या पाकिस्तानची धडपड सुरु आहे. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या देशाना FATF मध्ये टाकण्यात येते. या देशांचा आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मदत मिळवण्याचा मार्ग बंद होतो.