भारतात दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता आहे. गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपने प्रशिक्षण दिलेले दहशतवादी भारतातील काही ठिकाणी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती दिली आहे. या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानमध्ये प्रशिक्षण देण्यात आलं असून जम्मू काश्मीरमधून ३७० कलम हटवण्याच्या घटनेला वर्ष होत असल्याने हा हल्ला नियोजित आहे. ५ ऑगस्ट रोजी दहशतवादी हल्ला करण्याची शक्यता असून याच दिवशी अयोध्येत राम मंदिर भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. याआधी दहशतवाद्यांचा मे महिन्यात जम्मू काश्मीरमध्ये ईदच्या दिवशी हल्ला करण्याचा कट फसला होता. एएनआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.

गुप्तचर यंत्रणांनी गेल्या काही आठवड्यांमध्ये मिळालेल्या माहितीच्या आधारे सांगितल्यानुसार, दहशतवादी १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी देखील दहशतवादी हल्ला करु शकतात. गुप्तचर यंत्रणांना अलर्ट दिल्यानंतर, अयोध्या, दिल्ली, जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

नक्की पाहा खास फोटो >> अयोध्या सजली… शहरातील घरं, रस्ते, दुकानं सारं काही ग्राफिटी पेंटिगने नटली

गुप्तचर यंत्रणांकडून अलर्ट देताना सांगण्यात आलं आहे की, “जम्मू काश्मीरमध्ये हल्ला कऱण्यासाठी पाकिस्तानी लष्कराच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपकडून २० तालिबान सदस्यांना जलालबाद येथे प्रशिक्षण देण्यात आलं आहे. २६ मे ते २९ मे दरम्यान दहशतवाद्यांनी हल्ल्याचा प्रयत्न केला होता. पण सुरक्षा जवान अलर्ट असल्याने त्यांचा कट फसला”.

पाकिस्तान लष्कर या २० ते २५ दहशतवाद्यांना जम्मू काश्मीरला लागून असलेल्या नियंत्रण रेषेवरुन भारतात पाठवण्याचा प्रयत्न करणार असून पाच ते सहा दहशतवाद्यांना भारत-नेपाळ सीमारेषेवरुन भारतात आणण्याचा प्रयत्न असेल असंही गुप्तचर यंत्रणांनी सांगितलं आहे.

नक्की वाचा >> अयोध्या ते अमेरिका… टाइम्स स्वेअरवरील १७ हजार फुटांच्या स्क्रीनवर झळकणार प्रभू रामांची 3D प्रतिमा

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवून ५ ऑगस्ट रोजी वर्ष होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला होत असल्याचा अंदाज सुरक्षा यंत्रणांनी व्यक्त केला असून १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा होत असतानाही हा हल्ला होण्याची भीती आहे. तसंच ५ ऑगस्ट रोजी अयोध्या राम मंदिर भूमिपूजनावेळी हल्ला होण्याची शक्यताही नाकारु शकत नसल्याचं सुरक्षा यंत्रणांनी सांगितलं आहे. गुप्तचर यंत्रणांना अलर्ट दिल्याने लष्करासह पोलिसांनाही सतर्क राहण्यास सांगण्यात आलं असून सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.