भारताच्या दोन महत्वाच्या गुप्तचर यंत्रणांना काल नवीन प्रमुख मिळाले. इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखपदी अरविंद कुमार तर रॉ च्या प्रमुखपदी सामंत गोयल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या निवडीनंतर दोन्ही तपास यंत्रणांमध्ये वेगवेगळा मूड पाहायला मिळत आहे. इंटेलिजन्स ब्युरोमध्ये अरविंद कुमार यांच्यासोबत काम करण्यास अनेक अधिकारी उत्सुक आहेत. पण रिसर्च अँड अॅनलिसिस विंग म्हणजे रॉ मध्ये सामंत गोयल यांच्या निवडीनंतर तितका उत्साह दिसलेला नाही.

रिसर्च अँड अॅनलिसिस विंगच्या अधिकाऱ्याऐवजी आयपीएस अधिकाऱ्याची रॉ च्या प्रमुखपदी निवड झाल्याने रॉ मध्ये अनेकजण नाराज आहेत. एनडीटीव्हीने हे वृत्त दिले आहे. मूळचे रॉ मध्ये असलेले आर. कुमार यांची ज्येष्ठता डावलून सामंत गोयल यांनी निवड करण्यात आली. सरकारला आरएएसमधला नको तर आयपीएसमधला अधिकारी प्रमुखपदावर हवा असल्याचे स्पष्ट झाले आहे असे सूत्रांनी सांगितले.

आर. कुमार हे सामंत गोयल यांना वरिष्ठ आहेत. अनुभवाचा विचार करता आर. कुमार यांनी बांगलादेश, नेपाळ आणइ स्वित्झर्लंड या देशांमध्ये काम केले आहे. त्यांचा ट्रॅक रेकॉर्डही स्वच्छ आहे. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हे चांगले लक्षण नाही असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आर. कुमार १९८४ बॅचचे आरएएस अधिकारी आहेत.

युरोपमध्ये भारताविरोधातील खलिस्तानी चळवळीला लगाम घालण्यात सामंत गोयल यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्यामुळे वरिष्ठतेला डावलून या पदावर त्यांची निवड करण्यात आली असे काही जणांचे मत आहे. लंडन, दुबईमध्येही त्यांनी सेवा बजावली आहे. दहशतवादाला कसे हाताळण्याचे तसेच पाकिस्तानातील दहशतवादी गटांबद्दल त्यांना बरीच माहिती आहे. पाकिस्तानच्या विषयात ते तज्ञ समजले जातात असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारताने बालाकोटमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या तळावर एअर स्ट्राइक केला होता. या एअर स्ट्राइकच्या प्लानिंगमध्ये सामंत गोयल यांनी महत्वाची भूमिका बजावली होती. बालाकोट एअर स्ट्राइक आणि उरी हल्ल्यानंतर २०१६ साली करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राइकमध्ये सुद्धा त्यांची महत्वाची भूमिका होती.