दर १५ ते २० दिवसांनी सतर्क राहण्याचा अहवाल गुप्तचर यंत्रणांकडून राज्य सरकारांना पाठविला जातो. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, जास्तीत जास्त नेमका अहवाल देण्याचा प्रयत्न केला जाऊ लागला आहे. १६, १९ आणि २० तारखेला हैदराबाद, मुंबई, बेंगळुरू आणि कोईमतूर येथील पोलिसांना सतर्कतेचा आदेश दिला होता, अशी माहिती केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी राज्यसभेत दिली. नुसतेच बोलून काही उपयोग नाही, माझा कृतीवर विश्वास असल्याचेही त्यांनी सभागृहात सांगितले.
हैदराबादमध्ये गुरुवारी संध्याकाळी झालेल्या बॉम्बस्फोटांनंतर संसदेतील सदस्यांनी शिंदे यांना विविध प्रश्न विचारले. इतर कामकाज थांबवून बॉम्बस्फोटाच्या विषयावर चर्चा घेण्याची मागणी सकाळपासूनच सदस्यांनी लावून धरली होती. विरोधकांनी विचारलेल्या प्रश्नांना आणि टीकेला शिंदे यांनी उत्तरे दिली.
ते म्हणाले, सरकारने केलेल्या विविध उपायांमुळे दहशतवादी हल्ल्यांचे प्रमाण कमी झाले आहे. सरकारने राष्ट्रीय तपास संस्थेची स्थापन केली. सीमेवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली. नियंत्रण रेषेवर पुरेशी प्रकाशव्यवस्था करण्यात आली. विविध ठिकाणी बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱयांचाही उपयोग होतो आहे. २००८ मध्ये देशात दहा दहशतवादी हल्ले झाले होते. गेल्या वर्षी दोन हल्ले झाले. हल्ले पूर्णपणे थांवविण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये अधिक समन्वय ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.