राजीव गांधी फाउंडेशननं परदेशातून देणग्या घेताना कायद्याचं उल्लंघन केल्याचा आरोप असून, या प्रकरणाचा केंद्र सरकार तपास करणार आहे. केंद्र सरकारनं प्रकरणाच्या चौकशीसाठी आंतर मंत्रालयीन समिती गठित केली आहे. ईडीचे संचालक (सक्त वसुली संचालनालय) या समितीचे प्रमुख असणार आहेत. पीटीआयनं यासंबंधीचं वृत्त दिलं आहे.

राजीव गांधी फाउंडेशननं परदेशातून विशेषतः चीनकडून देणग्या घेताना पीएमएलए, आयकर कायदा, एफसीआरए या कायद्यातील विविध नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप आहे. ही माहिती समोर आल्यानंतर केंद्र सरकारनं तपास करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयानं संपूर्ण प्रकरणाचा तपास करण्यासाठी आतंर मंत्रालयीन समितीची स्थापना केली आहे.

राजीव गांधी फाउंडेशनबरोबर इतर दोन फाउंडेशनचीही चौकशी

परदेशातून स्वीकारण्यात आलेल्या देणग्यासंदर्भात केंद्र सरकार राजीव गांधी फाउंडेशनबरोबरच इतर दोन फाउंडेशनचीही चौकशी करणार असल्याचं वृत्त आहे. यात राजीव गांधी चॅरिटेबल ट्रस्ट व इंदिरा गांधी मेमोरियल ट्रस्ट यांचा समावेश आहे. आंतर मंत्रालयीन समितीच या तिन्ही संस्थांच्या देणग्यासंदर्भातील चौकशी करणार आहे.

भाजपाध्यक्षांनी केला होता लाच घेतल्याचा आरोप

एका व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करताना भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काँग्रेसवर चीनकडून लाच घेतल्याचा आरोप केला होता. राजीव गांधी फाउंडेशनला चीनकडून मिळालेल्या देणगीवरून हा आरोप करण्यात आला होता. “२००५-०६मधील राजीव गांधी फाउंडेशनला डोनेशन देणाऱ्यांची यादी आहे. यात चीनच्या दूतावासानेही डोनेशन दिलं आहे. हे स्पष्टपणे दिलं आहे. हे असं का झालं. याची काय गरज पडली? यात अनेक उद्योगपतींचीही नावं आहेत. चीनच्या दूतावासाकडून लाच घेतली हे पुरेसं नव्हतं का? चीनच्या दूतावासाकडून लाच घेण्यात आली. काँग्रेसनं याचं उत्तर द्यावं की चीनसोबत इतकं प्रेम का आहे? देशाला जाणून घ्यायचं आहे की, राजीव गांधी फाउंडेशनला इतका पैसा कोणत्या गोष्टीसाठी देण्यात आला आणि त्यांनी देशात कोणता अभ्यास केला. भ्रष्टाचाराचे अनेक प्रकार असतात. लोकांना आपल्या बाजूनं करण्यासाठी अनेक युक्त्या असतात आणि आज चीनविरोधात असे उभे आहेत, जसं की यांच्या बरोबरीचं कुणीच नाही,” असा आरोप नड्डा यांनी काँग्रेसवर केला होता.