चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या पश्चिम बंगालला एक हजार कोटी रुपयांचे तर ओडिशाला ५०० कोटी रुपयांचे अंतरिम साहाय्य देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी केली.

मोदी यांनी शुक्रवारी राज्यपाल जगदीप धनखार आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासमवेत चक्रीवादळग्रस्त परिसराची हवाई पाहणी केली. उत्तर २४ परगणा जिल्ह्य़ातील बासिरहाट येथे धनखार, बॅनर्जी आणि राज्यातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांसमवेत स्थितीचा आढावा घेतल्यानंतर मोदी यांनी, चक्रीवादळात ठार झालेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपये, तर जखमींना प्रत्येकी ३० हजार रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले.

देशात करोनाचा फैलाव झालेला असतानाच नैसर्गिक आपत्तीला तोंड देण्यासाठी बॅनर्जी यांनी राज्यातील यंत्रणेमार्फत जे प्रयत्न केले त्याची मोदी यांनी या वेळी स्तुती केली.

मोदी यांनी ओडिशातील चक्रीवादळग्रस्त भागांची हवाई पाहणी केली. राज्यपाल गणेशी लाल आणि मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांच्यासमवेत चर्चा करून स्थितीचा आढावा घेतला. जगतसिंहपूर, केंद्रपारा, भद्रक, बालासोर, जाजपूर आणि मयूरभंज जिल्ह्य़ांची मोदी यांनी जवळपास ९० मिनिटे पाहणी केली.

दरम्यान अम्फन चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम बंगालमध्ये एक लाख कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले असल्याचे शुक्रवारी राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे. या चक्रीवादळात आतापर्यंत ८० जणांचा मृत्यू झाला असून राज्यातील हजारो लोक बेघर झाले आहेत. बांगलादेशतही मृतांची संख्या आता २२ झाली असून अनेक जण विस्थापित झाले आहेत.