नेहमीच आपल्या चमत्कारीक वक्तव्यासाठी प्रसिध्द असलेल्या शेख रशीद अहमद या पाकिस्तानच्या गृहमंत्र्यांची जीभ आज पुन्हा एकदा घसरली. वेतनवाढीसाठी पाकिस्तान सरकार विरोधात निदर्शन करण्याऱ्यांवर पाकिस्तान पोलिसांनी अश्रूधुराचा वापर केला होता, या संदर्भात मत मांडताना रशीद म्हणाले की, “अश्रूधुराचे गोळे बरेच दिवस पडून होते त्यामुळे चाचणी करण्यासाठी त्यांचा वापर करणे गरजेचे होते.”

पाकिस्तान पोलिसांनी १० फेब्रुवारी रोजी वेतन आणि पेंशन वाढीसाठी निदर्शन करण्याऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर अश्रूधुराचा वापर केला होता. रावळपिंडी येथील एका सभेत बोलताना रशीद यांनीं आपलं मतं मांडलं होतं. सोशल मीडियावर बऱ्याच लोकांनी त्यांच्या या वक्तव्याबद्दल निषेध नोंदविला आहे आणि त्यांनी जाहीरपणे लोकांची क्षमा मागावी अशी मागणी केली आहे.

आजतकने दिलेल्या बातमी नुसार, पाकिस्तानातील समा टिव्हीने असे सांगितले आहे की, त्या निदर्शनासाठी जवळजवळ दोन हजार लोकांनी एकत्र जमून संसद भवनावर मोर्चा नेण्याची योजना आखली होती. याच मोर्चावर पोलिसांनी अश्रूधुराच्या गोळ्यांचा वापर केला होता. सरकारच्या आपल्या कर्मचाऱ्यांसोबतच्या अशा वागणुकीबद्दल विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारला जाब विचारला आहे.