जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या लुंबिनी या जन्मस्थळाजवळ आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्याचा निर्णय नेपाळ सरकारने घेतला आहे. भारत-नेपाळ सीमेनजीक तीन अब्ज डॉलरचा हा प्रकल्प चीनच्या मदतीने साकारला जाणार आहे.
भारत-नेपाळ सीमेजवळील भैरावा येथे २०१७ पर्यंत उभारण्यात येणाऱ्या गौतम बुद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या बांधकामासाठी जागतिक निविदा मागवण्यात आल्याची माहिती नेपाळचे पर्यटन सचिव सुशील घिमिरे यांनी दिली.
आंतरराष्ट्रीय विमान प्रकल्पाअंतर्गत विशेष विकास क्षेत्र उभारण्याचा नेपाळचा मानस आहे. सौदी अरेबियामधील मक्केप्रमाणे लुंबिनी शहर पर्यटन, धार्मिक क्षेत्रासह शैक्षणिक केंद्र म्हणून जगभरात नावारूपाला यावे आणि लुंबिनी शहरात जगभरातील पर्यटकांचा ओघ वाढावा यासाठी या ठिकाणी बुद्धांच्या नावाने आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारण्यात येणार आहे.
जून २०१७ पर्यंत विमानतळाचे काम पूर्ण करण्याचा नेपाळ सरकारचा मानस असून सुमारे तीन अब्ज डॉलर इतका खर्च येणार असून नेपाळला यासाठी चीनचे पाठबळ मिळणार आहे. नेपाळमधील काठमांडू येथे एकमेव आंतरराष्ट्रीय त्रिभुवन विमानतळ आहे. या विमानतळाच्या विमानतळाच्या धावपट्टीवर अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. त्यामुळे अनेक विमानांची उड्डाणे रद्द करण्याची पाळी आली होती. या पाश्र्वभूमीवर नवीन बुद्ध आंतरराष्ट्रीय विमानतळ मोठा पर्याय ठरेल, असेही घिमिरे यांनी सांगितले.