कुलभूषण जाधव फाशी प्रकरण; भारताचा दावा फेटाळला

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना हेरगिरी केल्याच्या आरोपावरून पाकिस्तानने त्यांना ठोठावलेल्या फाशीच्या शिक्षेस आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिल्याबाबत पाकिस्तानने मौन पाळले आहे. त्यांच्या अधिकाऱ्यांनी याबाबत काही सांगण्यास नकार दिला. जाधव यांना हेरगिरीच्या आरोपाखाली लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावली होती. पाकिस्तानने शिक्षेस स्थगितीच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या आदेशावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. स्थानिक माध्यमांनी फार थंड प्रतिसाद दिला व नंतर भारताचा दावा फेटाळून लावला.

जीओ टीव्हीने म्हटले आहे, की आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कायदे पाकिस्तानला लागू नाहीत किंवा पाकिस्तान त्यांच्या न्यायकक्षेत येत नाही. ते केवळ दोन्ही पक्षांच्या संमतीने एखाद्या घटनेची दखल घेऊ शकतात. ‘डॉन’ या वृत्तपत्राने स्थगितीच्या आदेशाची बातमीच दिलेली नाही, तर ‘दी एक्स्प्रेस ट्रिब्यून’नेही स्थगितीचे वृत्त दिलेले नाही.

जाधव यांना गेल्या महिन्यात लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. भारताने त्यावर व्हिएन्ना करारानुसार जाधव यांना फाशीची शिक्षा दिल्याने आंतरराष्ट्रीय कायद्याचा भंग होत असल्याची याचिका दाखल केली होती. भारताने अपिलात म्हटले होते, की जाधव यांच्या स्थानबद्धतेबाबत आम्हाला कळवण्यात आले नाही. नंतर त्यांना अटक करण्यात आली. आरोपीला अशा प्रकरणात जी माहिती देणे आवश्यक असते ती दिली गेली नाही, त्यामुळे कायदेशीर तरतुदींचा भंग झाला असून, पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी भारताला जाधव यांच्याशी दूतावासामार्फत संपर्क साधू दिला नाही.

८ मे रोजी भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात अर्ज केला होता. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सांगितले, की मी जाधव यांच्या आईशी बोलले आहे व त्यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने फाशीला स्थगिती दिल्याच्या आदेशाची माहिती दिली आहे.

पाकिस्तानी सुरक्षा दलांनी असा दावा केला होता, की गेल्या वर्षी तीन मार्चला जाधव यांना बलुचिस्तानात अटक करण्यात आली. ते इराणमधून पाकिस्तानात आले होते व ते भारतीय नौदलाचे अधिकारी आहेत, असे पाकिस्तानने म्हटले होते. जाधव नौदलात कामाला होते, पण आता त्यांचा सरकारशी संबंध नाही, असे भारत सरकारने म्हटले होते व त्यांचे इराणमधून पाकिस्तानने अपहरण करून या प्रकरणात गुंतवल्याचा आरोप केला होता. भारताने जाधव यांच्या आईचे आवाहन पाकिस्तानला सादर केले होते.

शरीफ यांची लष्करप्रमुखांशी दुसऱ्यांदा भेट

पंतप्रधान शरीफ यांना आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे. लष्करप्रमुख बाजवा यांच्यासह पाकिस्तान गुप्तचर संघटनेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल मुख्तार आणि अर्थमंत्री इशाक दार यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. याबाबतीत आम्ही भारताकडून दाखल करण्यात आलेली याचिका आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अभ्यास करत आहोत, असे पाकिस्तानने म्हटले आहे.

आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या अधिकारांची कार्यकक्षा तपासणार

भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या फाशीला आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली असली तरी त्या न्यायालयाची कार्यकक्षा व अधिकार नेमके काय आहेत हे तपासून पाहावे लागेल, अशी प्रतिक्रिया पाकिस्तानी पंतप्रधानांचे परराष्ट्र सल्लागार सरताज अझीज यांनी दिली आहे. पाकिस्तान आताच्या घडामोडीवर येत्या काही दिवसांत निवेदन जारी करील, असे सांगून ते म्हणाले की, भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाखल केलेली याचिका व त्या न्यायालयाला असलेले अधिकार याचे आम्ही विश्लेषण करीत आहोत. पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा महंमद असीफ यांनी ट्विटरवर म्हटले आहे की,  जाधव यांच्या फाशीचा मुद्दा पुढे करून आमच्या देशात भारत सरकार पसरवीत असलेल्या दहशतवादावरून जगाचे लक्ष दुसरीकडे वळवले जात आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाखल केलेली याचिका हा पाकिस्तानातील भारत सरकारपुरस्कृत दहशतवादावरून लक्ष उडवण्याचा प्रयत्न आहे. जाधव यांच्या फाशीबाबत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांची भेट घेतली. बाजवा आणि शरीफ यांची आठवडाभरातील ही दुसरी भेट ठरली असून, या भेटीमुळे भारत-पाकिस्तान संबंधांमध्ये आणखी ताण वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कुलभूषण जाधव यांच्या जिवाला धोका

पाकिस्तानात पकडले गेलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांच्या जिवाला फाशीच्या शिक्षेमुळे धोका असून, त्यांना पाकिस्तानने बेकायदेशीररीत्या डांबून ठेवले आहे, या कारणास्तव भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात या प्रश्नावर दाद मागितली, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले यांनी सांगितले, की आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घेण्यात आला होता. जाधव यांच्याशी दूतावासामार्फत संपर्क साधू देण्यासाठी भारताने किमान सोळा वेळा पाकिस्तानला विनंती केली होती, पण त्याला प्रतिसाद देण्यात आला नाही. जाधव यांच्यावरील आरोप व त्यांच्या शिक्षेबाबतची कागदपत्रे पाकिस्तानकडे आम्ही मागितली होती, ती देण्यात आली नाहीत, असे त्यांनी सांगितले. पाकिस्तानी लष्करी न्यायालयाने जाधव यांना दिलेल्या फाशीच्या शिक्षेविरोधात त्यांच्या कुटुंबाने केलेल्या अपिलासही पाकिस्तानने प्रतिसाद दिला नाही, असे सांगून ते म्हणाले, की परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानचे परराष्ट्र सल्लागार सरताज अजिज यांना २७ एप्रिलला पत्र पाठवून जाधव कुटुंबीयांना व्हिसा मंजूर करण्याची विनंती केली होती, पण त्याकडेही पाकिस्तानने दुर्लक्ष केले आहे.