आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा भारताला आदेश

केरळजवळील समुद्रात २०१२ साली दोन भारतीय मच्छीमारांना ठार मारल्याबद्दल अटकेत असलेल्या इटलीच्या नौसैनिकाची सुटका करावी असा आदेश द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताला दिला असल्याची माहिती सोमवारी इटलीच्या परराष्ट्र खात्याकडून देण्यात आली. मात्र आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचा इटली विपर्यास करत असल्याचे भारतीय सूत्रांनी सांगितले.

इटलीच्या एमव्ही एन्रिको लेक्झी या तेलवाहू नौकेवर तैनात असलेल्या साल्वाटोर गिरोन आणि मॅसिमिलियानो लाटोरे या दोघा नौसैनिकांनी २०१२ साली केरळजवळील समुद्रात केलेल्या गोळीबारात भारताचे दोन मच्छीमार मारले गेले होते. इटलीच्या मते ही घटना आंतरराष्ट्रीय हद्दीत घडली आणि नौसैनिकांनी मच्छीमारांना सागरी चाचे समजून त्यांच्यावर गोळीबार केला. भारताची भूमिका आहे की, घटना भारतीय सागरी हद्दीत घडली आणि भारतीय कायद्यानुसार इटलीच्या नौसैनिकांना खुनाच्या गुन्ह्य़ात अटक झाली. त्यांच्यावर भारतात खटला सुरू झाला.

त्यापैकी लाटोरे याला पक्षाघाताचा त्रास झाल्याने २०१४ साली वैद्यकीय रजेवर इटलीला उपचारांसाठी जाण्यास परवानगी देण्यात आली. गेल्या महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने त्याच्या रजेची मुदत सप्टेंबपर्यंत वाढवण्यास परवानगी दिली. मात्र गिरोनला मायदेशी जाण्याची परवानगी नाकारण्यात आली. तो सध्या दिल्लीतील इटलीच्या दूतावासात स्थानबद्ध आहे. या प्रश्नावरून गेली काही वर्षे दोन्ही देशांतील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला आहे. सध्या हा खटला द हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयात चालवला जात असून त्याचा निर्णय स्वीकारण्याचे दोन्ही देशांनी मान्य केले आहे.