भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली लोकसभा निवडणुकीत मिळवलेल्या विजयाची दखल आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यांनीही घेतली आहे. मोदींचे हिंदू नेता असे वर्णन करणाऱ्या परदेशी प्रसारमाध्यमांनी मोदींच्या विजयापेक्षा काँग्रेसच्या पराभवाबाबत आश्चर्य व्यक्त केले आहे.
१० वर्षे सत्तेत घालवल्यानंतर काँग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. हिंदू नेते नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपने काँग्रेसचा सपशेल पराभव केल्याचे द स्ट्रेट्स टाइम्सने म्हटले आहे.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून सर्वाधिक सत्तेवर राहिलेल्या काँग्रेसला धक्का देणारा हा निकाल आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपने काँग्रेसला पराभूत केले आहे.
आर्थिक विकास आणि भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ांमुळे नाराज मतदारांनी काँग्रेसला नाकारल्याचे न्यूयॉर्क टाइम्सने म्हटले आहे.
आर्थिक सुधारणावादी आणि हिंदू नेते नरेंद्र मोदी या भारताचे नवे पंतप्रधान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अर्थव्यवस्थेला आलेल्या मरगळीच्या पाश्र्वभूमीवर सुधारणांची आशा मोदी यांनी जनतेला दाखवल्याचे वॉशिंग्टन पोस्टने म्हटले आहे, तर वादग्रस्त हिंदू राष्ट्रवादी नेते नरेंद्र मोदी हे लवकरच भारताचे नवे पंतप्रधान होणार असल्याचे टेलिग्राफने म्हटले आहे.