News Flash

आज दिवस योगाचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ११ डिसेंबर २०१४ रोजी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे.

| June 21, 2015 12:05 pm

Untitled-1पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने ११ डिसेंबर २०१४ रोजी २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. हा दिवस उत्तर अर्धगोलार्धातील सर्वात मोठा दिवस आहे म्हणून त्याची निवड करण्यात आली.  हा ठराव १७७ देशांनी पुरस्कृत केला होता.
भारतात सहा हजार वर्षांपूर्वी महाऋषी पतंजली यांनी योगशास्त्राचा पाया घातला असे म्हटले जाते. हा दिवस योग दिन पाळण्यावरून विरोधी पक्षांनी भाजपवर अनेक आरोप केले. त्यात धर्माचा मुद्दाही आडवा आणण्यात आला, पण संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस बान की मून यांनी योग दिनाचा धर्माशी काही संबंध नाही असे सांगून त्याला अधिकृत उत्तर दिले होते त्यामुळे योग दिनाच्या या मुद्दय़ाला धार्मिक रंग देणे चुकीचे होते हेच सिद्ध झाले. या कार्यक्रमाची सक्ती करण्यात आल्याचाही दावा करण्यात आला, पण त्यात सक्ती करण्यात आली नसल्याचे सरकारनेच म्हटले आहे. काहींनी नमाजामध्येही योगासने असतात असा दावा केला. योगासने ही एक जीवनपद्धती आहे, त्यामुळे मानवी जीवन निरामय होते. फक्त त्याचा पद्धतशीर व रोजचा सराव असला पाहिजे व त्यात शास्त्रीय पद्धतीनेच योगाची उपासना केली पाहिजे. शरीर व मन यांना एकत्र आणण्याचे काम योगसाधनेत केले जाते. भारताने आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव मांडण्यास देशादेशातील मैत्रीचे संबंध भारतीय तत्त्वज्ञान व परंपरेच्या माध्यमातून वाढवण्याचाही एक हेतू आहे. तत्त्वज्ञान परंपरेचा वापर राजनीतीसाठी करण्याची ही आधुनिक काळातील पहिलीच वेळ आहे.
राज्यांमध्ये कार्यक्रम
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नागपुरात योग दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहतील, नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू चेन्नई तर आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा हैदराबादेत कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. कृषी मंत्री राधामोहन सिंह बिहारमध्ये मोतिहारी, तेल मंत्री धर्मेद्र प्रधान भुवनेश्वरला जाणार आहेत.

गिनीज विक्रमाची अपेक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार २१ जून रोजी सकाळी ६.४० वाजता योग दिनाची सुरुवात करतील. सर्वात मोठा कार्यक्रम दिल्लीत राजपथावर होत असून त्यात ते सहभागी होत आहेत. ३७ हजार लोक यात उपस्थित राहून योगाची प्रात्यक्षिके करणार आहेत. यावेळी एकाचवेळी एकाच ठिकाणी जास्त व्यक्तींनी योगासने करण्याचा गिनीज विक्रम करण्याचा विचार आहे. योगगुरू बाबा रामदेव यांनी त्यासाठी आधीपासून तालिम घेतली आहे व ते यावेळी उपस्थित राहणार आहेत. रामदेव यांच्या व्यतिरिक्त ४ योगतज्ज्ञ यावेळी उपस्थित असतील, २८ मोठय़ा पडद्यांवर हा कार्यक्रम दाखवला जाणार आहे. ५० देशांतील ८०-१०० परदेशी नागरिक योगासनात सहभागी होणार आहेत. १४०० मीटरच्या पट्टय़ात राजपथावर योगासाठी खास ३७ हजार मॅटसची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारी कर्मचारी व अधिकारी त्यात सहभागी होतील. दिल्लीत ४० रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. डॉक्टर व पॅरामेडिकल कर्मचारीही उपस्थित राहतील.

दिल्लीत योगपर्व
या कार्यक्रमात योगावर आधारित चर्चा, ध्यानधारणा, कार्यशाळा, नृत्य, नाटक असे कार्यक्रम २१ ते २७ जून दरम्यान होतील. दिल्ली मेट्रोतही योग दिन साजरा होत आहे. पहाटे ४ वाजताच मेट्रो सुरू होत असून गर्दी टाळण्यासाठी काश्मिरी गेट व चांदणी चौक, रेस कोर्स, पटेल चौक, सचिवालय व उद्योग भवन येथे तिकिटांची व्यवस्था आहे.

आकाशातही योगप्रसार
योग तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी स्पाइसजेटच्या मदतीने व इशा फाऊंडेशनच्या सहकार्याने हाय ऑन योगा अ‍ॅट ३५००० फूट हा कार्यक्रम आयोजित केला आहे. विमान कंपनीचे कर्मचारी व योग प्रशिक्षक योगासने करतील.

संयुक्त राष्ट्रात कार्यक्रम
परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज संयुक्त राष्ट्रात कार्यक्रमाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. यावेळी त्यांच्यासमवेत आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्रीश्री रविशंकर असतील. युनोच्या सभागृहात न्यूयॉर्क येथे सकाळी ११ ते १२ हा कार्यक्रम होणार आहे, टाईम्स स्क्वेअरमध्ये तो दाखवला जाईल.
प्रशिक्षकांची मागणी वाढणार
आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमांमुळे योगप्रशिक्षकांची मागणी ३५ टक्के वाढणार असल्याचे एका अभ्यासात म्हटले आहे. योगामुळे अब्जावधी डॉलरची बाजारपेठ तयार होईल, कंपन्यांचे प्रशिक्षण, सुटीतील शिबिरे, आयुर्वेद केंद्रे येथे योग प्रशिक्षकांना काम मिळण्याची संधी आहे.

परदेशात कार्यक्रम
चीन, अमेरिका व इतर पाश्चात्त्य देशांनी योग कार्यक्रमाला पाठिंबा दिला आहे. चीनमध्ये तर योग महाविद्यालय सुरू करण्यात आले आहे. पाकिस्तानने मात्र आपल्या योग प्रशिक्षकांना व्हिसा नाकारला. त्यामुळे तेथील कार्यक्रम साधेपणाने करावा लागत आहे. त्याचमुळे भारताने अफगाणी तालिबान्यांशी संबंध असल्याचे कारण दाखवून पाकिस्तानी अधिकाऱ्यास राजनैतिक व्हिसा नाकारला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 21, 2015 12:05 pm

Web Title: international yoga day
Next Stories
1 ‘टी न्यूज’ वाहिनीला पोलिसांची नोटीस
2 आसाराम बापूचा जामीन अर्ज सहाव्यांदा फेटाळला
3 राहुल-इराणी यांच्यात रस्सीखेच
Just Now!
X