International Yoga Day 2018: आज भारतीयांसाठी गर्वाचा क्षण असून आज जगात जिथे जिथे सुर्योदय होईल तिथे लोक योग करुन सुर्याचे स्वागत करतील, असे सांगतानाच योग लोकांना जोडण्याचे काम करतो, असे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले. मोदींच्या उपस्थितीत डेहाडूनच्या वन संशोधन संस्थेत सर्वात मोठा कार्यक्रम पार पडत असून यात सुमारे ५० हजार जण सहभागी झाल्याचे सांगितले जाते.

भारतासह जगभरात आज चौथा आंतरराष्ट्रीय योग दिवस असून यानिमित्त देशभरात विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहे. डेहराडूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत योगदिवस साजरा करण्यात आला. या प्रसंगी मोदींनी उपस्थितांना संबोधित केले. मोदी म्हणाले, डेहराडून पासून ते डबलिनपर्यंत, शांघाय पासून ते शिकागोपर्यंत आणि जकार्तापासून जोहान्सबर्गपर्यंत सर्वत्र योगच योग दिसत आहे. हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण आहे.

योग आयुष्याला समृद्ध करतो. जेव्हा फूट पाडणाऱ्या शक्ती वरचढ ठरतात त्यावेळी समाजात तणाव निर्माण होतो. भेदाची एक भिंत उभी राहते. परिवारात वाद होतात. माणूस मानसिक तणावात जगू लागतो. अशा स्थितीत योग उपयुक्त ठरतो. योग लोकांना जोडण्याचे काम करतो. समाजात सद्भावना निर्माण करतो, असे मोदींनी सांगितले. संयुक्त राष्ट्रात पहिल्यांदाच सर्वाधिक देशांनी योग दिवसाच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला होता, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.

दरम्यान, भारतीय दूतावासांच्या समन्वयातून १५० देशांमध्येही हा कार्यक्रम साजरा केला जाणार आहे. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २१ जून २०१४ मध्येच आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर करत, भारताच्या मागणीवर मोहोर उमटवली होती.