यूजीसीच्या पत्राबाबत आयुष मंत्रालयाचा खुलासा

२१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करताना सुरुवातीला ‘ओम’ आणि काही संस्कृत श्लोकांचे उच्चारण करण्याच्या आयुष मंत्रालयाच्या शिष्टाचाराचे पालन करण्याचे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिल्यानंतर

निर्माण झालेल्या वादाच्या पाश्र्वभूमीवर आयुष मंत्रालयाने नरमाईची भूमिका घेतली आहे. ‘ओम’स्मरणाची सक्ती करण्यात आलेली नसल्याचे आयुष मंत्रालयाने स्पष्ट केले.

विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव जसपाल एस. संधू यांनी गेल्या आठवडय़ात विद्यापीठांना पाठविलेल्या पत्रात योगादरम्यान आयुष मंत्रालयाचे शिष्टाचार पाळण्याचे निर्देश दिले होते.

यावरून काँग्रेस, संयुक्त जनता दल, माकप आणि राजदने भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले होते.

योग ही प्राचीन भारताची मोठी देण आहे. त्यावर भाजपची मालकी नाही. योग अधिकाधिक व्यापक आणि स्वीकारार्ह करण्याची गरज आहे. मात्र, भाजप तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते पी. सी. चाको यांनी केली होती.

संयुक्त जनता दलाचे ज्येष्ठ नेते के. सी. त्यागी यांनीही भाजपला लक्ष्य केले. भारतीयांवर जातीय अजेंडा लादण्याचा हा प्रयत्न असून, आमचा त्यास विरोध आहे, असे त्यागी यांनी स्पष्ट केले होते.