आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने दिल्लीसह देशभरात जोरदार तयारी सुरू आहे, मात्र ‘स्पाइसजेट’ या हवाई सेवा पुरविणाऱ्या कंपनीने योगाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवण्याचे ठरवले आहे. त्यासाठी स्पाइसजेटने विमान प्रवासादरम्यान योगासने करण्याचा बेत आखला आहे. विशेष म्हणजे या निवडक विमानांमधील प्रवाशांना ३५ हजार फुटांवर योग करण्याची संधी मिळणार आहे.
‘हाय ऑन योगा अ‍ॅट ३५००० फीट’ नावाच्या या उपक्रमांतर्गत स्पाइसजेटच्या विमानांमधील कर्मचारी वर्ग आणि इशा फाऊंडेशनचे योग प्रशिक्षक प्रवाशांना उपयोग शिकवणार आहेत. उपयोग हा विशेषत: हवाई प्रवासात करावयाचा योगाचा प्रकार आहे. या योगामुळे सांधे, स्नायू यांना बळकटी मिळते. विमान प्रवासात योग करणारी स्पाइसजेट ही एकमेव कंपनी असल्याचा आम्हाला अभिमान आहे. पंतप्रधानांनी सुरू केलेल्या उपक्रमाचा एक भाग असल्याने आम्ही आनंदी आहोत, असे स्पाइसजेटचे एमडी अजय सिंग यांनी सांगितले.