इंटरनेट ही जरी आजच्या काळातील अपरिहार्य गोष्ट असली, तरी त्यामुळे समाजात झालेल्या बदलांवर नोबेल पुरस्कार विजेते व्ही. रामकृष्णन यांनी भाष्य केले आहे. इंटरनेटमुळे लोकशाहीला बळकटी आली असली, तरी त्याचे धोकेही तितकेच गंभीर आहेत, असे सांगताना रामकृष्णन यांनी इंटरनेटमुळे समाजातील झुंडीला व्यक्त होण्याचे माध्यम मिळाले आहे आणि ते खूप धोकादायक आहे, असे त्यांनी एका कार्यक्रमात सांगितले.
ते म्हणाले, इंटरनेट येण्यापूर्वीही समाजात झुंडशाही होतीच. पण आता सोशल मीडियामुळे झुंडीला व्यक्त होण्याचे साधन मिळाले आहे. माझ्यामते ते खूप धोकादायक आहे. इंटरनेट मूर्ख व्यक्तींनाही मदत करते. त्यात काही बदमाशी करणारे लोकही असतात. इंटरनेटमुळे दहशतवाद्याशी जोडले जाण्याचा धोकाही उदभवतो. झुंडशाहीमुळे असामाजिक आणि धोकादायक व्यवहारांचाही प्रसार होतो. त्यामुळे मग सरकारला लोकांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावून त्यांच्यावर काही बंधने घालावी लागतात. लोकांना इंटरनेट वापरावर काही बंधने घालावी लागतात.
इंटरनेट लोकशाहीपूरक आणि धोकादायक दोन्ही आहे का, या विषयावरील चर्चेत भाग घेताना रामकृष्णन यांनी ही मते मांडली. २००९ साली रामकृष्णन यांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.