चीन सरकारने इंटरनेट वापरावरील र्निबध अधिक कडक करण्यासाठी पावले उचलली आहेत.
चीनच्या इंटरनेट नेटवर्क माहिती कार्यालयाने यासाठी नवे नियम तयार करण्यात आले आहेत. यात ‘व्हॉट्सअ‍ॅप’सारखी इतर कोणतीही लघुसंदेश प्रणाली  वापरण्यास नागरिकांवर बंधने येणार आहेत. राजकीय आणि सामाजिक दृष्टीने संवेदनशील असलेली माहिती केवळ प्रस्थापित प्रसारमाध्यमे आणि वृत्तवाहिन्याच प्रसारित आणि ‘पोस्ट’ करू शकतील. विशेष म्हणजे चीन सरकारने वृत्तपत्रे तसेच वाहिन्या आणि इंटरनेटवर आधीच प्रभावी नियंत्रण मिळवले आहे.
इंटरनेटवरील माहिती आदानप्रदान करण्यातील सार्वजनिक वापर नियंत्रित करण्यामागे चीन सरकारने तसे सबळ कारणही पुढे केले आहे. सरकारचे म्हणणे असे आहे की, सार्वजनिक संपर्काच्या नव्या साधनांचा वापर अधिक योग्यप्रकारे आणि निर्दोष व्हावा म्हणून हे नियम तयार करण्यात आले आहेत. दरम्यान, आशियातील स्मार्ट फोन वापरकर्त्यांमध्ये कमालीच्या लोकप्रिय ठरलेल्या ‘काकाओ टॉक’ आणि ‘लाइन’ या दोन मोबाइल संदेश सेवा ‘ब्लॉक’ करण्यात आल्याचे चीन सरकारने दक्षिण कोरियाला सांगितले. दोन्ही देशांतील विघातक शक्तींकडून संवेदनशील माहितीचे आदानप्रदान होऊ शकते, अशी भीती चीनला वाटत असल्याचे एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. चीनने नियंत्रणाचा वरंवटा प्रथम ‘मायक्रोब्लॉगिंग’वर फिरवला आहे. फार कमी काळात या प्रणालीने मिळवलेली लोकप्रियता सरकारला डाचत असल्याने अत्यंत कडक नियम तयार करण्याचा सरकारचा मानस आहे, असे सूत्रांनी सांगितले.