लखनौ : उत्तर प्रदेशची राजधानी असलेल्या लखनौ शहरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात गुरुवारी करण्यात आलेल्या आंदोलनात हिंसाचारामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर इंटरनेट सेवा रात्रीपासून बंद करण्यात आली आहे. मध्यरात्रीनंतर इंटरनेटवर बंदी घालण्यात आली.

दरम्यान अलिगड येथे शुक्रवारच्या नमाजानिमित्त कडक सुरक्षा तैनात करण्यात आली असल्याचे जिल्हादंडाधिकारी चंद्रभूषण सिंह यांनी सांगितले. अलिगडमध्ये प्रांतिक निम सुरक्षा दलाच्या १० कंपन्या व जलद कृती दलाच्या ४ कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. लखनौत एसएमएस सेवाही बंद करण्यात आल्याचे समजते. दरम्यान शुक्रवारी आंदोलन फिरोझाबाद, गोरखपूर, भदोही, बहराईच, संभळ या भागात पसरले असून तेथे मोठय़ा प्रमाणावर हिंसाचार सुरू आहे.

गृह खात्याचे सचिव अवनीश कुमार अवस्थी यांनी सांगितले, की नागरिकत्व कायद्याच्या विरोधात गुरुवारी रात्री लखनौत हिंसक आंदोलन करण्यात आले. त्यात जाळपोळही करण्यात आली असून त्यानंतर मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. हे प्रतिबंध शनिवारी दुपारपर्यंत लागू राहणार आहेत.

गुरुवारी लखनौत हिंसक आंदोलन झाले होते, त्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. जमावाने मोठय़ा प्रमाणात दगडफेक करून जाळपोळ केली होती. नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलनानंतर संभल, आजमगड, मऊ , गाजियाबाद, अलिगड व बरेली या ठिकाणी मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशातही निर्बंध

लखनऊ : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधातील निदर्शनांमुळे लखनऊ आणि उत्तर प्रदेशातील अन्य काही भागांमधील सर्व दूरसंचार कंपन्यांची मोबाइल इंटरनेट आणि संदेश सेवा शुक्रवारी स्थगित ठेवण्यात आली होती. गुरुवारी लखनऊमध्ये या स्थगितीबाबतची घोषणा करण्यात आली.