पंजाब नॅशनल बँकेला १३ हजार कोटींना चुना लावून पळालेल्या नीरव मोदीच्या बहिणीविरोधातही इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे. आठवड्याभरापूर्वीच नीरव मोदीचा निकटवर्तीय मानला जाणारा मिहिर भन्साळी याच्याविरोधातही रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. आता इंटरपोलने नीरव मोदीची बहिण पूर्वी दीपक मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केली आहे.

रेड कॉर्नर नोटीसमध्ये इंटरपोलने १९२ सदस्य देशांना याबाबतची सूचना दिली आहे की ही व्यक्ती कुठेही आढळली तर तिला अटक करण्यात यावी किंवा ताब्यात घेण्यात यावे. त्यानंतर प्रत्यार्पण कारवाई सुरू केली जाईल. इंटरपोलने जारी केलेल्या नोटीसनुसार पूर्वीला इंग्रजी, गुजराती आणि हिंदी भाषा येतात. ती बेल्जियमची नागरिक आहे.

याआधी २ जुलै २०१८ ला १३ हजार कोटींचा बँक घोटाळा करुन फरार झालेल्या नीरव मोदीविरोधात इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली. फरार होऊन परदेशात जाऊन वास्तव्य केलेल्या नीरव मोदीला पुन्हा भारतात आणण्यासाठी भारताकडून पुरेपूर प्रयत्न केले जात असून यासंबंधी अनेकदा ब्रिटनसोबत पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. यासोबतच नीरव मोदीकडे एकापेक्षा जास्त भारतीय पासपोर्ट नसल्याचंही सांगण्यात आलं आहे. सीबीआयने इंटपोलकडे नीरव मोदीविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यासाठी विनंती केली होती.