स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु नित्यानंद विरोधात इंटरपोलने ब्ल्यू नोटीस जारी केली आहे. बलात्काराच्या आरोपानंतर नित्यानंद फरार झाला. गुजरात पोलिसांच्या विनंतीवरुन ही ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. परदेशात असलेल्या नित्यानंदला ताब्यात घेता यावे यासाठी, गुजरात पोलिसांकडून आता त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

इंटरपोलच्या नियमानुसार, ब्लू नोटीस जारी झाल्यानंतर त्या व्यक्तीची ओळख, त्याच्या संदर्भात माहिती तसेच त्याचा गुन्ह्यात कितपत सहभाग आहे याची माहिती गोळा करता येते. वादग्रस्त नित्यानंद विरोधात इंटरपोलने या महिन्यात ब्लू नोटीस जारी केली आहे पोलीस उपअधीक्षक के.टी.कामारीया यांनी ही माहिती दिली.

नित्यानंद मागच्यावर्षी भारत सोडून पळाला. त्याआधीच परराष्ट्र मंत्रालयाने त्याचा पासपोर्ट रद्द केला होता. अज्ञातस्थळी निघून जाण्याआधी तो नेपाळला गेल्याचे बोलले जाते. नित्यानंदचा पासपोर्ट २००८ साली जारी झाला. सप्टेंबर २०१८ मध्ये त्याचा पासपोर्ट रद्द करण्यात आला. नित्यानंदने नव्या पासपोर्टसाठी अर्ज केला पण पोलिसांनी मंजुरी दिली नाही.

नित्यानंद विरोधात कर्नाटकात बलात्कार प्रकरणी गुन्हा नोंदवलेला आहे. मागच्यावर्षी नित्यानंद विरोधात अपहरणाच्या गुन्हा नोंदवला गेला. मागच्या दोन दशकात नित्यानंदने जे अध्यात्माचे साम्राज्य उभे केले त्यासाठी देणगी गोळा करण्यासाठी लहान मुलांचा वापर केल्याचा त्याच्यावर आरोप आहे.