लॉस एंजेलिस : अमेरिकेच्याच नव्हे तर जगभरातील दूरचित्रवाणी व रेडिओ प्रसारणात व अगदी डिजिटल माध्यमातही  नाममुद्रा उमटवणारे मुलाखतकार, सादरीकरणकर्ते लॅरी किंग यांचे लॉस एंजेलिस येथे वयाच्या ८७ व्या वर्षी निधन झाले. अमेरिकेत किमान अर्धशतकाच्या काळात त्यांनी संवाद माध्यमांचा बाजच बदलून टाकला. ओरा मीडियाने दिलेल्या माहितीनुसार, सेडार्स-सिनाई मेडिकल सेंटर येथे त्यांची प्राणज्योत  मालवली. सीएनएनवर त्यांनी पंचवीस वर्षे ‘लॅरी किंग  लाइव्ह’ हा कार्यक्रम सादर केला. तो अत्यंत गाजला.  प्रसारण क्षेत्रातील साठ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांनी अनेक राजकीय नेते, वलयांकित व्यक्ती, क्रीडापटू यांच्या मुलाखती घेतल्या होत्या.  दिलखुलास शैलीत फिरक्या घेत त्यांनी जागतिक नेते, चित्रपट अभिनेते यांच्या मुलाखती घेतल्या.   रेडिओपासून सुरुवात करून त्यांनी दूरचित्रवाणीच्या जगात प्रवास सुरू केला. त्यांचा ‘लॅरी किंग शो’ १९८५ ते २०१० या काळात गाजला. सीएनएनच्या वृत्तानुसार त्यांना करोना उपचारांसाठी रुग्णालयात ठेवले होते.  १९९२ मध्ये त्यांच्या किंग्ज शो कार्यक्रमात रॉस पेरॉट या उद्योगपतीने अध्यक्षीय उमेदवारी जाहीर केली होती. किंग यांनी एकूण पन्नास हजार मुलाखती घेतल्या. कालांतराने ते लॉस एंजेलिसला आल्यानंतर वलयांकित व्यक्तींच्या बातम्या त्यांच्या कार्यक्रमातून प्रथमच जाहीर होऊ लागल्या. त्यात मायकेल जॅक्सन, पॅरीस हिल्टन यांच्याबाबतच्या गोपनीय बातम्याही लोकांना मिळत असत. केबल टीव्हीचा काळ सुरू झाला तेव्हा सीएनएनचा तटस्थतेसाठी बोलबाला असताना लॅरी किंग यांनीही मध्यम मार्ग पत्करला.  मुलाखतीसाठी कठीण मानल्या जाणाऱ्या मार्लोन ब्रँडो यांची मुलाखत त्यांनी ९० मिनिटे घेतली होती. १९९८ मध्ये त्यांच्या ‘लॅरी किंग शो’ची दर्शक संख्या १.६४ दशलक्ष होती.