चीनमध्ये करोना विषाणूचा संसर्ग सुरू झाल्याची माहिती पहिल्यांदा देऊन जागल्याची भूमिका पार पाडणाऱ्या डॉक्टरच्या मृत्यूची चौकशी तेथील भ्रष्टाचार विरोधी संस्थेने नेमलेल्या पथकाने सुरू केली आहे. या डॉक्टरने विषाणूबाबत डिसेंबरमध्ये धोक्याचा इशारा दिला असताना पोलिसांनी अफवा पसरवण्याचा आरोप केला होता.

वुहान पोलिसांनी आठ स्थानिक लोकांना अफवा पसरवल्याबाबत ताकीद दिली होती, त्यात ली (वय ३४) यांचा समावेश होता.  वुहान येथील केंद्रीय रुग्णालयात नेत्रशल्यविशारद असलेल्या डॉ. ली यांनी वेबोवरील पोस्टमध्ये ३० डिसेंबरला वुई चॅटच्या माध्यमातून सांगितले होते, की ७  रुग्णांच्या सार्स चाचण्या सकारात्मक आल्या आहेत.

बळींची संख्या ६३६

चीनच्या नवीन करोना विषाणूने घेतलेल्या बळींची संख्या आता ६३६ झाली आहे. हुबेई प्रांतात ७३ जण नव्याने मरण पावले असून निश्चित रुग्णांची संख्या ३१ हजार झाली असल्याची माहिती चीनच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे. हुबई प्रांत व त्याची राजधानी असलेले वुहान शहर येथे करोना विषाणूचा संसर्ग मोठय़ा प्रमाणात झाला असून गुरुवारी जिलीन, हेनान,ग्वांगडाँग , हैनान प्रांतात प्रत्येकी एक बळी गेला आहे, अशी माहिती चीनच्या राष्ट्रीय आरोग्य विभागाने दिली आहे. गुरुवारी ७३ जण मरण पावले.