नामांकित इन्वेस्टमेंट बँकिंग कंपनी Goldman Sachs च्या उपाध्यक्षाला फसवणुकीच्या प्रकरणाखाली अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर 38 कोटी रूपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. कंपनीचे उपाध्यक्ष अश्वनी झुनझुनवाला हे फॉरेक्‍स अँड इक्विटी सेटलमेंट डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होते. ऑनलाईन पोकरमध्ये त्यांनी तब्बल 47 लाख रूपये गमावले होते. तसंच त्यांच्यावर 45 लाखांचे कर्जही होते. त्यामुळे त्याला बँकेनेही कर्ज देण्यास नकार दिला होता, अशी माहिती समोर आली आहे.

झुनझुनवाला यांना कलम 419 आणि 420 (फसवणूक) आणि कलम 408 आणि 409 अंतर्गत अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त एम.एन.अनुचेत यांनी दिली. त्यांना लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांची लवकरच कंपनीतून हकालपट्टी करण्यात येणार असून त्याची कार्यवाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती बर्खास्त Goldman Sachs कंपनीकडून देण्यात आली. झुनझुनवाला यांनी कंपनीच्या खात्यातून काढलेली रक्कम हाँगकाँगमधील सिनर्जी व्हिसडम नावाच्या कंपनीच्या खात्यात पाठवले होते. तसेच कोणालाही याची माहिती मिळू नये यासाठी त्यांनी कथितरित्या आपल्या अन्य कर्मचाऱ्याच्या ऑफिस सिस्टमचा वापर केला असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.

सध्या बंगळुरू पोलीस Goldman Sachs कंपनीच्या वेदांत नावाच्या एका माजी कर्मचाऱ्याचा शोध घेत आहे. झुनझुनवाला आणि वेदांत यांनी मिळून हा घोटाळा केला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. झुनझुनवाला यांनी यापूर्वी टाटा कॅपिटल कंपनीतही सेवा बजावली होती.