परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी पर्यावरण व इतर परवाने त्वरित दिले जातील व महाराष्ट्र राज्याला उद्योगाच्या दृष्टिकोनातून आकर्षक ठिकाणाचा दर्जा मिळवून दिला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
राज्यात उद्योगांसाठी परिस्थिती सुधारते आहे, २४ तास वीज व पाणी दिले जात आहे असे सांगून ते म्हणाले की, गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे.
फडणीस हे तीन दिवस दावोसला असून त्यांनी जगातील उद्योग क्षेत्रातील अधिकारी व सरकारांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा केली. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर देशातील वातावरणच बदलून गेल्याचा दावा त्यांनी केला.
आता राज्ये स्पर्धात्मक बनली आहे कारण पंतप्रधानांनी मेक इन इंडिया कार्यक्रमाची घोषणा केली. आता आम्ही मेक इन ओन स्टेट असे धोरण ठेवले आहे, असे सांगून ते म्हणाले की, मेक इन महाराष्ट्र योजनेत आम्ही उद्योगांना सर्व सुविधा देऊ , परवाना राज राहणार नाही. महाराष्ट्रात जमीन सुधारणा सुरू आहेत, काही परवाने आपोआप मिळण्याची सोय केली आहे. महाराष्ट्रात उद्योग स्थापन करण्यास १-३ वर्षे लागत असत. आता काही महिन्यांत तुम्ही उद्योग सुरू करू शकाल, असा दिलासा त्यांनी दिला. परवान्यांची संख्या कमी केल्याचा दावा करून ते म्हणाले की, माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे एक खिडकी योजना चालवण्यात येत आहे.