उत्तर प्रदेशातील वाढत्या गुन्हेगारीमुळे राज्यातून गुंतवणूकदारांनी काढता पाय घेतला होता, मात्र भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर आता पुन्हा गुंतवणूकदार उत्तर प्रदेशात परतू लागले आहेत, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सोमवारी येथे सांगितले.

राज्यातील यापूर्वीच्या राजवटीत गुन्हेगार सोकावले असल्याने गुंतवणूकदारांनी उत्तर प्रदेशातून स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती, मात्र भाजप सरकारने गुन्हेगारांना त्यांची योग्य जागी म्हणजेच कारागृहात रवानगी केल्याने गुंतवणूकदार पुन्हा राज्यात परतण्यात सुरुवात झाली आहे, असे आदित्यनाथ यांनी येथे एका निवडणूक सभेत सांगितले.

सपाच्या राजवटीत दंगली होत होत्या, मात्र आता दंगली उसळण्याचे प्रकार थांबले असून उत्तर प्रदेश राज्य गुन्हेगारीमुक्त झाले आहे. सपा आणि बसपाच्या राजवटीत सापत्नभाव होता, मात्र भाजप सर्वाना बरोबर घेऊन जात आहे, आम्ही पोलीस दलांत भरती सुरू करणार आहोत आणि पुढील तीन वर्षांत चार लाख युवकांना रोजगार देणार आहोत, असेही आदित्यनाथ म्हणाले.

उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाने गेल्या पाच वर्षांत केलेल्या भरतीची चौकशी करण्यात येणार आहे आणि त्यामध्ये जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.