आयपीएलमधील स्पॉट फिक्सिंगमध्ये आणखी एखाद्या संघातील खेळाडूंचा सहभाग असण्याची शक्यता दिल्लीचे पोलिस आयुक्त नीरजकुमार यांनी व्यक्त केलीये. मात्र, यासंदर्भात पोलिसांना कोणतेही ठोस पुरावे आढळलेले नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने स्पॉट फिक्सिंगच्या आरोपावरून राजस्थान रॉयल्सच्या एस. श्रीशांत, अजित चंडिला आणि अंकित चव्हाण या तिघांना अटक केली. या तिघांनाही न्यायालयाने आता न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या विषयावर पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना नीरजकुमार यांनी ही माहिती दिली.
राजस्थान रॉयल्सशिवाय अन्य कोणत्या संघातील खेळाडू स्पॉट फिक्सिंग करत होते, याची पुराव्यांसह माहिती सध्या आमच्याकडे नाही. मात्र, अन्य संघातील खेळाडूंचा स्पॉट फिक्सिंगमध्ये सहभाग असण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असे नीरजकुमार म्हणाले. पुरावे असल्याशिवाय कोणत्याही खेळाडूचे किंवा संघाचे नाव घेणे मला उचित वाटत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.