आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी चिदंबरम यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. पी चिदंबरम यांनी दिल्ली उच्च न्यायालयाकडून नाकारण्यात आलेल्या अटकपूर्व जामीन अर्जाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेत निर्णयाला आव्हान दिलं होतं. मात्र सर्वोच्च न्यायालायने त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला आहे. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना ट्रायल कोर्टात नियमित जामिनासाठी अर्ज करु शकता असं सांगितलं आहे. आयएनएक्स मीडिया प्रकरणी सीबीआय तपास करत आहेत. सीबीआयबरोबरच सक्तवसुली संचलनालयाकडूनदेखील या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

सर्वोच्च न्यायालयाने अर्ज फेटाळताना सांगितलं आहे की, “प्राथमिक स्तरावर अटकपूर्व जामीन देणे तपासात अडथळा आणू शकतं. अटकपूर्व जामीन देण्यास मान्यता देण्यासाठी हे योग्य प्रकरण नाही. आर्थिक गुन्हे गंभीर असून त्यांना वेगळ्या पद्धतीने हाताळण्याची गरज आहे,”.

आयएनएक्स मीडिया भ्रष्टाचारप्रकरणी चिदंबरम यांना २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या निवासस्थानावरुन सीबीआयने नाट्यमयरित्या अटक केली होती. अटक झाल्यापासून पी चिदंबरम जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करत असून सर्वोच्च न्यायालयानेही जामीन अर्ज फेटाळल्याने चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. ईडीदेखील पी चिदंबरम यांना अटक करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.