आयएनएक्स मीडिया प्रकरणी अटकेत असलेल्या माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यात सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला असून पी चिदंबरम यांचा तिहार तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पी चिदंबरम तब्बल १०६ दिवसांनी तुरुंगाबाहेर येणार आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना दोन लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. चिदंबरम यांना जामीन मिळताच काँग्रेसकडून ट्विट करत अखेर सत्याचाच विजय झाला आहे अशी प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

आणखी वाचा- “अखेर सत्याचाच विजय”, चिदंबरम यांना जामीन मंजूर होताच काँग्रेसचं ट्विट

जामीन मंजूर करताना घातलेल्या अटी
जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने चिदंबरम यांना काही अटी घातल्या आहेत.
१) परवानगीशिवाय देशाबाहेर जाता येणार नाही
२) साक्षीदारांना भेटण्यास आणि त्यांना प्रभावित करण्यास मज्जाव
३) माध्यमांना मुलाखती देण्यास बंदी
४) सार्वजनिक मंचावर बोलू नये
५) पुराव्यांशी छेडछाड करु नये

पी चिदंबरम यांना आधीही झाला होता जामीन मंजूर
पी चिदंबरम यांना याआधी २२ ऑक्टोबरला सीबीआयने दाखल केलेल्या गुन्ह्यात जामीन मंजूर झाला होता. पण ईडीकडे ताबा असल्याने त्यांना तुरुंगातच राहावं लागलं होतं. न्यायालयाने त्यांना एक लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला होता.

चिदंबरम यांची डोकेदुखी ठरलेले INX मीडिया प्रकरण आहे तरी काय ?
– चिदंबरम यांच्यावर आयएनएक्स मीडिया प्रकरणात भ्रष्टाचार आणि आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप आहे.

– आयएनक्स मीडिया ही पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जीची कंपनी आहे. हे दोघेही सध्या शीना बोरा हत्याप्रकरणात तुरुंगात आहेत.

– आयएनएक्स मीडियामधील परकीय गुंतवणुकीचा प्रस्ताव परकीय गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने (एफआयपीबी) स्वीकारला होता. त्यापाठोपाठ अर्थमंत्रालयाने १८ मार्च २००७ रोजी ४ कोटी ६४ लाख रुपयांपर्यंतच्या गुंतवणुकीला मान्यता दिली होती.

– आयएनएक्स मीडियाने नियमांचे उल्लंघन करत आयएनएक्स न्यूज या नवीन कंपनीत २६ टक्के गुंतवणूक करताना परकीय गुंतवणूकदारांना समभागांची विक्री ८०० रुपये दराने केली. यामुळे फक्त ४. ६२ कोटी रुपयांची परवानगी असताना परकी गुंतवणूक ३०५ कोटींपर्यंत पोहोचली.

– प्राप्तिकर खाते आणि महसूल विभागाने या प्रकरणात कंपनीला नोटीसही बजावली. मात्र, त्यावेळी कार्ती चिदंबरम कंपनीच्या मदतीला धावून आले, असे सांगितले जाते. त्यांनी वडील पी. चिदंबरम यांच्या पदाचा वापर करत कंपनीला नव्याने परवानगी मिळवून दिली. त्यावेळी पी. चिदंबरम हे केंद्रीय अर्थमंत्री होते.

– या मोबदल्यात कार्ती यांच्याशी संबंधीत कंपन्यांमध्ये साडे तीन कोटींहून अधिक रक्कम देण्यात आल्याचा आरोप आहे.

– सीबीआयने या प्रकरणात मे २०१७ मध्ये कार्ती चिदंबरम, त्यांची चेस मॅनेजमेंट सर्व्हिसेस कंपनी, तसेच अॅडव्हॉन्टेज स्ट्रॅटेजिक कन्सल्टिंग कंपनीच्या पद्मा विश्वनाथन, आयएनएक्स मीडियाचे संचालक पीटर व इंद्राणी मुखर्जी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

– ईडीने २०१८ मध्ये या संबंधी मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल केला होता

– पी. चिदंबरम, त्यांची पत्नी नलिनी व मुलगा कार्ती चिदंबरव हे तिघेही वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. नलिनी यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये गाजलेल्या शारदा चिटफंड घोटाळ्यात कोट्यवधी रुपये घेतल्याचा आरोप आहे. तर कार्ती यांच्यावर राजस्थान रुग्णवाहिका गैरव्यवहाराप्रकरणी आरोप झाले होते. एअरसेल- मॅक्सिस प्रकरणातही चिदंबरम पिता-पुत्रांवर आरोप झाले होते.