आयएनएक्स मीडिया प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना अटक करण्यात आली आहे. सीबीआयने चिदंबरम यांना दिल्लीमधील जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानावरुन अटक केली. पी चिदंबरम यांना अटक करण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून प्रयत्न सुरु होते. मात्र पी चिदंबरम बेपत्ता होते. अखेर २७ तासांनंतर पी चिदंबरम समोर आले आणि काँग्रेस कार्यालयात पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडली. यानंतर सीबीआय त्यांना अटक करण्यासाठी काँग्रेस कार्यालयात दाखल झाली होती. पण पी चिदंबरम घरी रवाना झाल्याने सीबीआयदेखील तिथे पोहोचलं आणि अटकेची कारवाई केली. मात्र यावेळी चिदंबरम यांच्या घराबाहेर हायव्होल्टेज ड्रामा पहायला मिळाला. चिदंबरम यांना अटक करून सीबीआयच्या मुख्यालयात आणण्यात आलं आहे. यातील एक भाग असा की त्यांना अटक करून ज्या सीबीआयच्या ज्या इमारतीत आणण्यात आलं आहे त्या इमारतीच्या उद्घाटनादरम्यान चिदंबरम हे मुख्य अतिथी म्हणून उपस्थित होते. सीबीआयच्या या नव्या इमारतीचं उद्घाटन 2011 मध्ये करण्यात आलं होतं.

2011 मध्ये चिदंबरम यांच्या खांद्यावर गृहमंत्रीपदाची धुरा होती. सीबीआयच्या मुख्य कार्यालयाचे उद्घाटन तत्कालिन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या हस्ते करण्यात आले होते. तसेच यावेळी या कार्यक्रमात चिदंबरम यांच्याव्यतिरिक्त कपिल सिब्बल, विरप्पा मोईली, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

मंगळवारपासून सीबीआय आणि ईडी चिदंबरम यांचा शोध घेत होती. परंतु ते बेपत्ता झाले होते. बुधवारी रात्री 8 वाचता अचानक ते काँग्रेसच्या कार्यालयात पोहोचले. त्या ठिकाणी त्यांनी आपली बाजू मांडली आणि आपल्या निवासस्थानी रवाना झाले. त्या पाठलाग करत सीबीआयची टीम काँग्रेसच्या मुख्यालयात पोहोचली होती. परंतु त्यावेळी ते आपल्या निवासस्थानी रवाना झाले होते. त्यानंतर त्यांना त्यांच्या निवासस्थानाहून अटक करण्यात आली.