आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणात बुधवारी (21 ऑगस्ट) रात्रीच्या हायव्होल्टेज ड्राम्यानंतर देशाचे माजी गृह आणि अर्थमंत्री पी.चिदंबरम यांना अटक करण्यात आली. रात्री दहाच्या सुमारास सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी घरात घुसून चिदंबरम यांना ताब्यात घेतले. सीबीआय मुख्यालयात रात्रभर चौकशी केल्यानंतर, आज (22 ऑगस्ट) दुपारी दोन वाजता त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. दरम्यान, आयएनक्स मीडियाचे प्रमोटर इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांनी दिलेल्या साक्षीमुळे चिदंबरम अडचणीत आले असून त्यांच्या साक्षीमुळेच चिदंबरम यांना अटक झाल्याची जोरदार चर्चा आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, शिना बोरा हत्याप्रकरणात अटक असलेल्या इंद्राणी मुखर्जी यांच्या साक्षीने चिदंबरम यांच्या अटकेमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या वृत्तानुसार, अंमलबजावणी संचालनालयाने चिदंबरम यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्रात देखील इंद्राणी मुखर्जींनी दिलेल्या साक्षीचा उल्लेख केला आहे. तर, इंद्राणी मुखर्जी यांच्या साक्षीच्या आधारेच पी. चिदंबरम यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आल्याचं वृत्त एनडीटीव्हीने सुत्रांच्या आधारे दिलं आहे.

काय होती साक्ष –
आयएनएक्स मीडिया घोटाळ्याप्रकरणी इंद्राणी मुखर्जी आणि पीटर मुखर्जी यांची चौकशी ईडीने केली होती. त्यावेळी इंद्राणी मुखर्जीने दिलेल्या माहितीनुसार, आयएनएक्स मीडियाच्या प्रकल्पाला फॉरेन इन्व्हेस्टमेंट प्रमोशन बोर्डाची मंजुरी मिळत नव्हती. त्यामुळे याबाबत नॉर्थ ब्लॉकमधील कार्यालयात मुखर्जी दाम्पत्याने त्यावेळचे अर्थमंत्री पी. चिदंबरम यांची भेट घेतली होती. पीटर मुखर्जी यांनी चिदंबरम यांच्याशी संवाद साधला. तेव्हा माझ्या मुलाला व्यापारात मदत करा, असं चिदंबरम यांनी सांगितलं. त्यावेळी चिंदबरम यांनी किती रकमेची लाचेची मागणी केली होती हे मात्र इंद्राणी मुखर्जीने सांगितलं नव्हतं. त्यानंतर दिल्लीतील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये कार्ति चिदंबरमला मुखर्जी दाम्पत्य भेटलं होतं. तेव्हा आयएनएक्सचा तिढा सोडवण्यासाठी चिदंबरम यांचे पुत्र कार्तीने १० लाखांची लाच मागितली होती. तसंच त्याच्या विदेशी बँकेतील खात्यात ही रक्कम जमा करावी अशी विनंती ही केली होती. तसंच ही रक्कम जमा करण्याचे इतरही मार्ग सुचवले होते, अशी साक्ष इंद्राणी मुखर्जीने दिली होती.

दरम्यान, यापूर्वी या प्रकरणात सीबीआयने चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना 28 फेब्रुवारी 2018 रोजी अटक केली होती, जे सध्या जामीनावर बाहेर आहेत. 2007 मध्ये आयएनएक्स मीडियाला एफआयपीबी मंजुरी मिळवून देण्यासाठी कथितरित्या लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.  

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Inx media money laundering case case against p chidambaram built on indrani mukerjeas statement sas
First published on: 22-08-2019 at 09:48 IST