INX मीडिया प्रकरणात दिल्ली हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायलायत धाव घेणाऱ्या माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. पी चिदंबरम यांच्या अटकपूर्व जामीनावर शुक्रवारी सुनावणी होणार असल्या कारणाने अटकेची टांगती तलवार कायम आहे. याचिकेची सुनावणी कोणत्या खंडपीठासमोर घ्यायची याचा निर्णय गुरुवारी संध्याकाळपर्यंत घेतला जाणार आहे. त्या खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी पार पडणार आहे.

पी चिदंबरम यांना ताब्यात घेण्यासाठी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी आज (बुधवार) सकाळी सीबीआयची टीम पोहोचली मात्र, ते घरात उपलब्ध नसल्याने सीबीआयला रिकाम्या हाती परतावे लागले. दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी अटकपूर्व जामीन नाकारल्यानंतर चिदंबरम यांच्या वकीलांनी सर्वोच्च न्यायालयात स्पेशल लिव्ह पेटिशन (एसएलपी) दाखल केली होती. अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळावे यासाठी ही याचिका दाखल करण्यात आली होती.

सर्वोच्च न्यायालयाचे न्या. एन. व्ही. रामणा यांच्या कोर्टासमोर आज (बुधवार) ही याचिका सुनावणीसाठी आली होती. मात्र, न्या. रामणा यांनी या प्रकरणावर निर्णय देण्यास नकार देत तुम्ही सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्यासमोर दाद मागावी असा सल्ला चिदंबरम यांच्या वकीलांना दिला होता. मात्र, तोपर्यंत दिल्ली हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती तरी द्यावी अशी विनंती चिदंबरम यांचे वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टाला केली. मात्र, न्या. रामणा यांनी यालाही नकार दिला होता. चिदंबरम यांच्या वतीने वरिष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल, सलमान खुर्शिद आणि विवेक तनखा हे बाजू मांडत आहेत.

मंगळवारपासून चिदंबरम बेपत्ता असल्याने त्यांच्याविरोधात तपाय यंत्रणांनी लूकआऊट नोटीसही बजावली आहे. INX मीडिया प्रकरणात चिदंबरम यांच्याविरोधात सीबीआयकडून भ्रष्टाचारप्रकरणी तर ईडीकडून आर्थिक घोटाळा प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, काँग्रेसने चिदंबरम यांच्यावरील कारावाईबाबत भाजपावर निशाणा साधला आहे. “राज्यसभेचे खासदार असलेले पी. चिदंबरम हे अत्यंत हुशार आणि आदरणीय व्यक्तीमत्व असून त्यांनी केंद्रीय अर्थमंत्री आणि गृहमंत्री म्हणून अनेक दशकांपासून देशाची प्रामाणिकपणे सेवा केली आहे. त्याचबरोबर त्यांनी खरं बोलताना मोदी सरकारची पोलखोल सुरु केल्यानेच त्यांच्यावर राजकीय द्वेषापोटी कारवाई केली जात आहे,” असा आरोप काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी-वढेरा यांनी केला आहे.