आयफोन ५ नंतर आता पुढे काय, असा विचार देश-विदेशातील तमाम टेक्नोसॅव्ही करीत असतानाच येत्या उन्हाळ्यात अ‍ॅपल आयफोनचे पुढील मॉडेल लॉंच करण्याची शक्यता आहे. ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’ने याबाबतचे वृत्त दिलेय. अ‍ॅपलने याआधीचे दोन्ही मॉडेल हे हिवाळ्यात बाजारात आणले होते. त्यानंतर पहिल्यांदाच उन्हाळ्यामध्ये आयफोनचे नवे मॉडेल मोबाईल ग्राहकांपुढे येणार आहे.
विकसनशील देशातील मोबाईल ग्राहकांसाठी कमी किंमतीचा आयफोन आणण्याचाही विचार अ‍ॅपल करते आहे, असे या वृत्तामध्ये म्हंटलंय. सध्याच्या आयफोनच्या किंमती जास्त असल्यामुळे विकसनशील देशातील नागरिक तो खरेदी करण्याला जास्त प्राधान्य देत नाहीत. शिवाय त्यातील विविध अ‍ॅप्स हे केवळ अमेरिकेसह विकसित देशांतील ग्राहकांना डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आलेले असल्याने विकसनशील देशातील नागरिक त्याचा पुरेपूर वापर करू शकत नाहीत.
अ‍ॅपल कंपनीचे अभ्यासक आणि वॉल स्ट्रीटचे विश्लेषक या दोघांनी वर्तविलेल्या अंदाजानुसार हे वृत्त देण्यात आले आहे. गुगलच्या अ‍ॅंड्राईड सॉफ्टवेअरच्या साह्याने विविध कंपन्यांनी अतिशय स्वस्तातील स्मार्टफोन वेगवेगळ्या देशांतील बाजारात उपलब्ध करून दिले आहेत. या स्मार्टफोनच्या तुलनेत आयफोनच्या किंमती खूपच वरच्या आहेत, याकडेही विश्लेषकांनी लक्ष वेधले.
दरम्यान, लॉंचिंगची तारीख जाहीर होईपर्यंत भविष्यातील कोणत्याही नव्या मॉडेलबद्दल अ‍ॅपल अधिकृतपणे कधीच भाष्य करीत नाही, असेही या वृत्तात म्हटले आहे.