आयपीएल अर्थात इंडियन प्रीमियर लीगचा १४वा हंगाम ९ एप्रिल ते ३० मे या कालावधीत मुंबईसह देशातील सहा शहरांमध्ये रंगणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यातील सर्व सामने प्रेक्षकांविना होणार आहेत. देशातील सहा शहरांमध्ये हे सामने खेळवले जाणार असून, याबद्दल पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी आयपीएलचे वेळापत्रकं आणि शहरांच्या निवडीवरून बीसीसीआयला सवाल केला आहे.

मुंबईसह अहमदाबाद, बेंगळूरु, चेन्नई, दिल्ली आणि कोलकाता या शहरांमध्ये सामने होणार असून, करोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी या सहा शहरांमध्ये मुंबईचा समावेश करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी थेट बीसीसीआयला पत्र पाठवलं आहे. आयपीएलचे सामने खेळवण्यात येणाऱ्या शहरांमध्ये मोहालीचा समावेश केलेला नसल्यानं त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“दिवसाला ९ हजार करोना आढळून येत असताना मुंबईत सामने खेळवू शकता, तर मोहालीत सामने खेळवण्यात काय अडचण आहे? आम्ही आवश्यक त्या सर्व खबरदाऱ्या घेऊ,” असं कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

सहा शहरांमध्ये कोलकाताचा समावेश केलेला असला, तरी ‘बीसीसीआय’ने ६ मेपर्यंतच्या पहिल्या चार आठवड्यातील ३३ सामन्यांपैकी एकही सामना कोलकातात आयोजित केलेला नाही. बंगालमध्ये विधानसभा निवडणूक होत असल्यानं निर्णय घेतलेला आहे. गतवर्षी करोनाच्या साथीमुळे ‘आयपीएल’चा हंगाम उशिराने संयुक्त अरब अमिरातीमध्ये खेळवण्यात आला होता. मुंबई इंडियन्सने या हंगामाचे जेतेपद मिळवले होते. मात्र आता रुग्णसंख्या नियंत्रणात असल्यामुळे स्पर्धा भारतात घेण्याचे ठरवण्यात आले आहे.